एटीएम फसवणुकीत महाराष्ट्राने मारली बाजी !


मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका सर्वेक्षणातून एटीएमच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वाधिक फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. तर राजधानी दिल्ली एटीएमद्वारे फसवणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे एटीएम फसवणुकीची एकही घटना अरुणाचल प्रदेश, आसाम आणि त्रिपुरा या तीन राज्यांमध्ये समोर आलेली नाही.

चोरटे एटीएमला स्कीमर बसवून तर कधी मशीन फोडून ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारतात. चोरट्यांनी आतापर्यंत अनेक ग्राहकांच्या मेहनतीचा पैसा चोरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे कमी होते म्हणून की काय औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वीच चक्क एटीएम मशीन पळवल्याची घटना घडली होती. आपण नेहमीच एटीएम चोरीच्या किंवा फसवणुकीच्या घटना ऐकतो. पण यात आता एटीएमद्वारे झालेल्या फसवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे उघड झाले आहे.

२३३ महाराष्ट्रात एटीएम फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. यात ४.८१ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. राजधानी दिल्ली एटीएमद्वारे होणाऱ्या फसवणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एटीएम फसवणुकीच्या १७९ घटना दिल्लीत समोर आल्या असून यात २.९० कोटी रुपयांचे नुकसान झाले. तामिळनाडूत एटीएमद्वारे ३.६३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे आता एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएममधून पैसे काढू नका. त्याचबरोबर एटीएममध्ये सीसीटीव्ही आहे की नाही याची खातरजमा करून घ्या. तुम्ही कार्ड टाकता, त्याच्या खाली काही यंत्रणा स्कीमर लावले आहे का हे तपासून घ्या. कार्ड टाकता त्या जागी लाइट ब्लिंक होते का हे पाहा. अकाऊंटमधून तुम्ही पैसे काढले नसतील आणि तरी तसा मेसेज आला असेल तर तातडीने आपले कार्ड ब्लॉक करा आणि पोलीस-बँकेत तातडीने तक्रार करा.

बँका एटीएमवर सुरक्षारक्षक ठेवत नाहीत. ते याची जबाबदारी खासगी सुरक्षारक्षकांवर सोपवतात. पण एटीएममध्ये ठेवलेला पैसा जनतेचा आहे. बँकांना चोरीला गेलेला पैसा विम्यातून परत मिळतो. म्हणजे या सगळ्यातून खिसा सर्वसमान्यांचाच रिकामा होतो. त्यामुळे आता ग्राहकांनीच अधिक सजग राहणे गरजेचे आहे.

Leave a Comment