ट्रम्प यांची मुक्ताफळे अमेरिकेलाच भोवणार!


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेला दावा खोटारडा असल्याचे उघड झाले. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यालाही त्यावर सारवासारव करावी लागली. मात्र दक्षिण आशियातील परिस्थिती समजून न घेता ट्रम्प यांनी उधळलेली ही मुक्ताफळे अमेरिकेलाच भोवणार आहे,त असे परराष्ट्र व्यवहारातील बहुतांश तज्ञांचे मत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. त्यावेळी काश्मीर प्रश्नात चर्चेसाठी मी मध्यस्थी करायला तयार आहे. खुद्द नरेंद्र मोदी यांनीही या संदर्भात मला विनंती केली होती, असा दावा या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी केला. भारताने हा दावा लगोलग फेटाळून लावला. भारताने ट्रम्प यांच्याकडे काश्मिरप्रश्नी कधीही मदत मागितली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

माजी राजनयिक आणि तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नुकसान पोचू शकते. ट्रम्प यांनी हे वक्तव्य करण्यापूर्वी तयारी करण्याची गरज होती, असेही या तज्ञांचे मत आहे. ‘‘अध्यक्षांनी आज फार मोठे नुकसान केले आहे. काश्मिर आणि अफगाणिस्तानवरील त्यांचे वक्तव्य बिल्कुल योग्य नाही,’’ असे अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांच्या मते, अध्यक्षांना लवकरच दक्षिण आशियातील मुद्द्यांची गुंतागुंत समजेल. त्यांच्या मते, ‘‘अध्यक्ष ट्रम्प यांना अफगाणिस्तानवरील कराराबाबत पाकिस्तानकडून मदत हवी आहे. आणि त्यांनी मदतीची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते पाकिस्तानला ही मदत हवी आहे. त्यांनी उत्तर कोरियाचे सत्ताधीश किम जोंग-उन यांचे जसे कौतुक केले तसेच कौतुक इम्रान खान यांचे केले. करार करण्याची ही त्यांची ठरलेली प्रक्रिया आहे.’’

मात्र कोरियामध्ये त्यांना ज्या प्रकारे कोणताही तह करता आला नाही तसेच दक्षिण आशियातील ऐतिहासिक मुद्दे हेही रिअल इस्टेटच्या सौद्यांपेक्षा खूप गुंतागुंतीचे आहेत, हे त्यांना लवकरच समजून येईल, असेही हक्कानी यांनी सांगितले.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माजी राजनयिक एलिसा आयरेस म्हणाल्या, की ट्रम्प बैठकीसाठी पूर्वतयारी करून आले नव्हते. एलिसा या सध्या काऊंसिल फॉर फॉरेन रिलेशन्स या थिंक टँकमध्येकाम करतात.

गंमत म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही ट्रम्प हे खरोखरच काश्मिर मुद्द्यात हस्तक्षेप करतील यावर विश्वास नाही. ते अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात गुंतलेले आहेत आणि ही खरोखरच चांगली गोष्ट आहे, असे कार्नेगी एंडाऊमेंट फॉर इंटरनॅशनल पीसमधील सीनियर फेलो एश्ले टेलिस यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्याच जॉर्ज बुश यांच्या सरकारमध्ये निकोलस बर्न्स हे उप परराष्ट्रमंत्री होते.त्यांच्या मते, काश्मिरप्रश्नी मध्यस्थ म्हणून अमेरिकेच्या भूमिकेला भारत सरकारने सातत्याने नाकारले आहे.

हे सगळे लक्षात घेऊनच अमेरिकेच्या प्रशासनाने भारताची नाराजी दूर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. “काश्मिर हा भारत व पाकिस्तानदरम्यानचा एक द्विपक्षीय मुद्दा आहे. ट्रम्प सरकार भारत व पाकिस्तानातील चर्चेचे स्वागत करेल आणि अमेरिका याबाबतीत त्यांना मदत करेल,” असे दक्षिण आशियासाठीचे शीर्षस्थ अमेरिकी राजनयिक एलिस वेल्स यांनी ट्वीट केले. इतकेच नाही तर परराष्ट्र व्यवहारासाठीच्या हाऊस कमेटीचे अध्यक्ष एलियट एल. एंजेल यांनी अमेरिकेतील भारताचे राजूदत हर्षवर्धन श्रृंगला यांच्याशी चर्चा केली आणि काश्मिर मुद्द्यावरून अमेरिकेच्या जुन्या धोरणानुसारच पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. “आम्ही भारत व पाकिस्तानदरम्यान चर्चेचे समर्थन करतो आणि या संबंधातील निर्णय केवळ हे दोन देशच घेऊ शकतात, याचे आम्ही समर्थन करतो,” असे ते म्हणाले.

दुसरीकडे, ट्रम्प यांचे हे वक्तव्य म्हणजे लांच्छनास्पद चूक आहे, सांगत डेमोक्रॅटिक पक्षाचे संसद सदस्य ब्रॅड शेरमन यांनी तर भारताची माफीही मागितली आहे. भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्ष शृंगला यांच्याकडे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारची विनंती कधीही करणार नाहीत, हे सर्वांनाच माहीत आहे. ट्रम्प यांचे वक्तव्य बालिश आणि दिशाभूल करणारे आहे,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment