२०२२ साली पुन्हा एकदा समुद्रसफरीसाठी सज्ज होणार ‘टायटॅनिक – २’


‘टायटॅनिक -२’ आता जगाच्या भेटीला पुनश्च येण्यास सज्ज होत असून, ही चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या रूपात नाही, तर प्रत्यक्षात जगाच्या भेटीला येत आहे. मूळ टायटॅनिक बोटीची प्रतिकृती चीनमध्ये तयार करण्यात येत असून, प्रवाश्यांना ऐषारामी समुद्री सफर घडविण्याच्या दृष्टीने हे जहाज तयार करण्यात येत आहे. १९१२ साली टायटॅनिकला जलसमाधी मिळाल्यानंतर शंभर वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असला, तरी लोकांचे या जहाजाबद्दलचे कुतूहल कायम आहे. या जहाजावर आधारित, आणि त्याला अकस्मात घडलेल्या अपघातानंतर जहाजाला मिळालेल्या जलसमाधीच्या हकीकतीवर चित्रपट बनविला गेला. याच घटनेवर आधारित अनेक पुस्तके आजवर लिहिली गेली आहेत, माहितीपटही बनविले गेले आहेत. तसेच टायटॅनिक जहाजावर सापडलेल्या अनेक वस्तू आता विविध वस्तूसंग्रहालयांमध्ये जतन करुन ठेवल्या गेल्या आहेत. पण या जहाजाची पुनर्निर्मिती करण्याची, आणि त्यावर समुद्र सफरीची संधी लोकांना उपलब्ध करून देण्याची कल्पना मात्र हटके आहे.

टायटॅनिकची पुनर्निर्मिती करण्याची कल्पना अब्जाधीश क्लाइव्ह पाल्मर यांची असून, त्यांच्याच मालकीच्या ब्रिस्बेन येथील ब्ल्यू स्टारलाईन कंपनीच्या वतीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पातही अनंत अडचणी उद्भवल्याने याचे काम रखडले होते. सुरुवातीला काही कायदेशीर बाबींमध्ये हा प्रकल्प अडकला असून, २०१२ साली या प्रकल्पाचे सुरु झालेले काम २०१५ साली बंद करण्यात आले. आता सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली असून, या प्रकल्पाचे काम पुन्हा वेगाने सुरु झाले असल्याने ‘टायटॅनिक -२’, २०२२ साली दुबईच्या किनाऱ्यावरून पहिल्या वहिल्या समुद्रसफरीसाठी सिद्ध होत आहे. दुबईहून निघाल्यानंतर दोन आठवड्यांचा प्रवास करून हे जहाज साउथहॅम्प्टनला पोहोचणार आहे. त्यानंतर पुढे या जहाजाचा प्रवास न्यूयॉर्कच्या दिशेने सुरु होणार असून, मूळ टायटॅनिकच्या नियोजित प्रवासमार्गानेच ‘टायटॅनिक-२’ ही प्रवास करणार असल्याचे वृत्त बीबीसी वृत्तवाहिनीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Leave a Comment