हरिकिशन गोस्वामी ते भारतकुमारपर्यंत…!


हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन, लेखन, संपादन आणि अभिनय अशा चौफेर कामगिरीद्वारे प्रेक्षकांची मने जिंकणारे कलावंत म्हणून मनोजकुमार यांची ओळख आहे. विशेषतः देशभक्तीवर आधारित चित्रपटांसाठी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये देशभक्तीचा संदेश ठळकपणे असतो आणि या बहुतेक चित्रपटांमध्ये ते रंगवत असलेल्या नायकाचे नाव भारत असते. त्यामुळे भारतकुमार असेही त्यांना गमतीने म्हटले जाते.

मनोजकुमार यांचे मूळ नाव हरिकिशन गिरी गोस्वामी. त्यांचा जन्म 24 जुलाई 1937रोजी सध्याच्या पाकिस्तानात झाला. ते केवळ 10 वर्षांचे असताना देशाची फाळणी झाली आणि त्यांचे कुटुंब राजस्थानात येऊन स्थायिक झाले. फाळणीच्या वेदना त्यांनी जवळून अनुभवल्या असल्यामुळे त्यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांच्या बहुतेक चित्रपटांत तीच मध्यवर्ती कल्पना असते.

त्यांच्या मनावर परिणाम करणारी आणखी एक बाब म्हणजे दिलीपकुमार. लहानपणीच त्यांनी दिलीपकुमार यांचा अभिनय असलेला ‘शबनम’ हा चित्रपट पाहिला. दिलीपकुमार यांनी रंगविलेल्या पात्राने मनोजकुमार एवढे प्रभावित झाले, की त्यांनी अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन ते मुंबईला आले. अभिनेता म्हणून मनोजकुमार यांनी 1957मध्ये आलेल्या ‘फॅशन’ या चित्रपटाद्वारे चंदेरी पडद्यावर पदार्पण केले. मात्र त्यात त्यांची भूमिका अगदी मामुली होती.

चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी मनोजकुमार यांना 1957 पासून 1962 पर्यंत संघर्ष करावा लागला. या दरम्यान त्यांनी ‘कांच की गुडिया’, ‘रेशमी रूमाल’, ‘सहारा’, ‘पंचायत’, ‘हनीमून’, ‘पिया मिलन की आस’ अशा अनेक किरकोळ चित्रपटांत भूमिका केल्या. यातील एकाही चित्रपटाला गल्लाबारीवर यश आले नाही. मात्र दिग्दर्शक विजय भट्ट यांच्या 1962साली आलेल्या ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटाने त्यांचे नशीब खुलले. मनोजकुमार आणि माला सिन्हा यांची जोडी प्रेक्षकांना पसंत आली. त्यांचा ‘वह कौन थी’हा आणखी एक सुपरहिट चित्रपट 1964 साली आला. यात त्यांची नायिका होती साधना. पुढच्याच वर्षी 1965 मध्ये सुपरहिट ‘गुमनाम’ आला.

याच वर्षी, म्हणजे 1965 मध्ये, आलेल्या ‘शहीद’ने मनोजकुमार यांच्या कारकीर्दीला नवे वळण दिले. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या या चित्रपटात त्यांनी भगतसिंहांची भूमिका जीवंत केली होती. भारत-पाकिस्तानचे युद्ध 1965 सालीच झाले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा दिली होती. हे युद्ध संपल्यानंतर या घोषणेवर आधारित एखादा चित्रपट करावा, असे त्यांनी मनोजकुमार यांना सुचविले. त्यातूनच ‘उपकार’ या अविस्मरणीय चित्रपटाचा जन्म झाला. तो आला 1967 साली आणि मनोजकुमार यांनी त्यात शेतकरी व जवान साकारला होता. यात पहिल्यांदा त्यांचे नाव ‘भारत’ होते आणि याच नावाने ते चित्रोद्योगात प्रसिद्ध झाले.

वर्ष 1970 मध्ये मनोज कुमार यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेला ‘पूरब और पश्चिम’ प्रदर्शित झाला. तोही सुपरहिट ठरला. केवळ पैशांसाठी देश सोडून परदेशात जाणाऱ्यांचा विषय त्यांनी हाताळला होता. वर्ष 1974 मध्ये आलेला ‘रोटी कपडा और मकान’ हाही मनोजकुमार यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये गणला जातो. यात त्यांनी काळाबाजार आणि अर्थव्यवस्था असे विषय हाताळले होते.

या दरम्यान ‘दस नंबरी’, ‘शोर’ आणि ‘संन्यासी’ अशा तद्दन मसाला चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर मनोजकुमार यांनी सुमारे पाच वर्षे चित्रपट संन्यास घेतला. त्यानंतर 1981 मध्ये ‘क्रांति’द्वारे त्यांनी दुसरा डाव सुरू केला. गंमत म्हणजे त्यांचे आदर्श असलेल्या दिलीपकुमार यांनीही याच चित्रपटाद्वारे आपली दुसरी इनिंग सुरू केली. मनोज आणि दिलीप या कुमारांच्या जोडीला प्रचंड दाद मिळाली. मात्र हे मनोजकुमार यांचे अखेरच यश ठरले.

मुलगा कुणाल गोस्वामी याच्यासाठी काढलेला ‘पेंटर बाबू’ आणि रेखासोबत आलेला ‘क्लर्क’ असे चित्रपट जबरदस्त आदळले. ‘जय हिंद’ हा 1999 मध्ये आलेला चित्रपट निर्माता- दिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आतापर्यंत सात फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या मनोजकुमार यांना 2002 मध्ये पदमश्री देण्यात आली आणि 2016 मध्ये दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. आज या वयातही ते प्रसिद्ध गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्यावर चित्रपट बनवत आहेत. यावरून त्यांची चित्रपटावरील निष्ठा लक्षात येते.

Leave a Comment