प्रियंकांना अटक ही तर काँग्रेसला संजीवनी


उत्तर प्रदेशात नुकत्याच सपाटून मार खालेल्या काँग्रेसला अचानक परतीचा मार्ग सापडल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांना झालेल्या अटकेमुळे पक्षाला संजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

राज्यातील सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून करण्यात आलेल्या गोळीबारात 10 लोकांची हत्या करण्यात आली होती, तर २४ पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना प्रियंकांना अडवण्यात आले. यातील राजकीय संधी हेरलेल्या प्रियंका यांनी लगेच या अटकेच्याविरोधात मिर्झापुरात धरणे आंदोलन सुरू केले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही नेतेही आंदोलनास बसले. त्यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

मात्र राजकारणात अशी अटक ही मिळालेली एक संधी असते. त्यामुळेच काँग्रेसने देशभरात धरणे आणि निदर्शनांचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. पराभवामुळे मनोधैर्य गमावलेल्या कार्यकर्त्यांना त्याद्वारे ऊर्जा देण्याचा प्रयत्न काँग्रेस करेल. पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी तर सर्व काँग्रेस प्रभारी, प्रदेश अध्यक्ष आणि आघाड्यांना या संदर्भात पत्रही लिहिले आहे.

“आम्ही केवळ मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी सोनभद्रकडे जात आहोत. पोलिसांनी आम्हाला अटक केली आहे. पोलीस कुठे घेऊन जात आहेत, ते माहीत नाही; पण जिकडे घेऊन जातील तिकडे जायला आम्ही तयार आहोत. आम्ही भाजपाच्या कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही,” असे प्रियंका गांधी यांनी पत्रकारांना सांगितले.

त्यांच्या या आक्रमक पावित्र्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही साथ लाभली. उत्तर प्रदेश सरकारकडून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींना अडवणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. प्रियंका गांधी या फक्त 3-4 लोकांसोबत जात होत्या. सामाजिकभावनेतून एखाद्याच्या दु:खात सहभागी होण्यासाठी आणि त्यांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांना अशा प्रकारे अडवणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

प्रियंकांच्या अटकेने केवळ उत्तर प्रदेशातील राजकारण तापले असे नाही तर राष्ट्रीय पातळीवरही त्याचे पडसाद उमटले. पश्चिम उ. प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे यांनही योगी सरकारवर टीका केली.

काँग्रेसमध्ये आलेल्या या चैतन्याची चुणूक महाराष्ट्रातही पाहायला मिळाली. मुंबईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. प्रियंकांचया अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादर पश्चिम येथे इंडियाबुल्ससमोर निदर्शने केली व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले.

भाजपा सरकार प्रियंका गांधी यांना घाबरत आहे, म्हणूनच प्रियंका गांधी सोनभद्रला हिंसाचार पीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली आहे, अशी टीका काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. पुणे, पिंपरी-चिंचवड व अन्य शहरांतही अशी निदर्शने झाली.

याचा परिणाम चांगलाच झाला. शनिवारी प्रियंका गांधी यांनी मिर्झापूरच्या पीडितांच्या नातेवाईकांची भेट घेतली. मिर्झापूर येथे विश्रामगृहात ही भेट झाली. त्यानंतर त्या दिल्लीला रवाना झाल्या. प्रियंकाने आधीची रात्र विश्रामगृहातच घालवली होती.

”ज्यांनी मला अटक केली, आपल्या गाडीत बसवून आणले, ज्यांनी मला या दरवाज्यापासून त्या दरवाजापर्यंत अडवले…तेच आज मला सांगत आहेत, की मला अटक झालेली नाही, मी स्वतंत्र आहे. मी जाऊ शकते. मला त्यांना सांगायचे आहे, की माझा उद्देश पूर्ण झाला, मी त्या कुटुंबियांना भेटले. आज मी जात आहे मात्र मी परत येईन,” असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

प्रियंका यांचे म्हणणे खरे आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुरती मान टाकली होती. राहुल गांधी यांच्या सह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पक्षाचे नेतृत्व कोण करत आहे, याबाबतही संभ्रमाची स्थिती आहे. इतकेच नाही तर कर्नाटकासारख्या मोठ्या राज्यातील सरकार जाते की काय, अशी भीतीही निर्माण झाली. या परिस्थितीत प्रियंकांची ही अटक पक्षाला एक वरदान ठरली नसती तरच नवल. काँग्रेस कार्यकर्त्यांना उभारी देणे हा त्यांचा उद्देश होता. तो या निमित्ताने साध्य झाला. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारला त्यामुळे बॅकफूटवर जाणे भाग पडले. ” प्रियांका गांधींना रोखणे म्हणजे लोकशाहीने दिलेल्या नागरी हक्कांची पायमल्ली आहे. पंतप्रधान मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चालवलेली हुकूमशाही व दडपशाही कॉंग्रेसचे कार्यकर्ते कदापी सहन करणार नाहीत,” हा संदेश देण्यात त्या यशस्वी झाल्या.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर केवळ तीन महिन्यांच्या आत प्रियंका गांधींनी अशी तडफ दाखवून सरकारची कोंडी करणे हे काँग्रेससाठी शुभशकून म्हणायला पाहिजे. मात्र पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी अशा आणखी एक धडक देण्याची गरज आहे. ती जिगर काँग्रेस दाखवेल का, हा खरा प्रश्न आहे.

Leave a Comment