मायाजाळात मायावती!


उत्तर प्रदेशातील राजकारणात वेगवेगळ्या भूमिका पार पाडून भारतीय जनता पक्षाला विरोध आणि मदत करण्यात मायावतींचा हातखंडा आहे. एकीकडे धर्मनिरपेक्ष राजकारणाची ग्वाही देत भाजपला दूषणे द्यायची आणि दुसरीकडे भाजपविरोधी पक्षांना नुकसान करायचे, असे राजकारण मायावतींनी यशस्वीपणे खेळले आहे. त्यांच्या या दुहेरी राजकारणामागे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचा मोठा हात असल्याचे मानले जाते. मायावती यांचे भाऊ आणि पक्षाचे उपाध्यक्ष आनंद कुमार यांची नोएडा (उत्तरप्रदेश) येथील ४०० कोटी रुपये मूल्याची ७ एकर भूमी प्राप्तिकर खात्याने विभागाने जप्त करून त्या चर्चेला आणखी बळ दिले आहे.

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा असलेल्या मायावती यांनी लोकसभा निवडणुकीआधी भाजप आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कडाडून विरोध केला होता. भाजपविरोधी मतांची फूट टाळण्यासाठी म्हणून त्यांनी समाजवादी पक्षाशी युतीही केली होती. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील हातमिळवणी प्रत्यक्ष मतदानात मात्र फळली नाही. त्यानंतर मायावती यांनी समाजवादी पक्षाला टाटा करून स्वतंत्र निवडणुका लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यातही अशाच प्रकरणांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्राप्तिकर खात्याने जप्त केलेली जमीन आनंद कुमार यांची पत्नी विचित्र लेखा यांच्या नावावर होती. याची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्यात आली नसल्याने ती बेनामी असल्यावरून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मायावती संतप्त होणे स्वाभाविक होते. ‘राजकीय सूडाने प्रेरित होऊन भाजपने कारवाई करण्याचा आदेश दिला’, असा आरोप करून त्यांनी भाजपवर टीका केली आहे. लोकांच्या दृष्टीने अर्थातच या आरोपात नवीन काही नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यावर अशी कारवाई होते, तेव्हा सत्ताधारी पक्षावर हाच आरोप केला जातो.

हा आरोप प्रत्येकवेळी कांगावाच असतो, असे नाही. अनेकदा तो खराही असतो आणि लोकांना ते पक्के माहीत असते. उलट अशा प्रकारे कारवाई केली जात नाही, तेव्हाही यात लागेबांधे असल्याचे किंवा राजकीय गणिते असल्याचे आरोप होतात. त्यामागची कारणेही लोकांना माहीत असतात.

त्यामुळे मायावती यांनी कितीही आरोप केले तरी त्यामागची गणिते लोकांना बरोबर कळतात. मायावती यांच्या दुर्दैवाने त्यांच्या निकटवर्तीयांनीही त्यांच्या या गणिताचे सूतोवाच केले आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर कर्नाटकातील बसपच्या एकमेव आमदाराचे घेता येईल. एन. महेश हे कर्नाटकचे एकमेव बसप आमदार. एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात ते माजी मंत्री होते. सध्या कर्नाटकात चालू असलेला सत्तेचा सी-सॉ खेळ सर्वांनाच माहीत आहे आणि कुमारस्वामी सरकार एका-एका आमदाराच्या मतासाठी जंग जंग पछाडत आहे. मात्र अशा मोक्याच्या वेळी महेश यांनी कुमारस्वामी सरकारपासून अंतर राखण्याचे संकेत दिले.

“मायावती यांच्या सूचनेवरून मी उद्या विधानसभेत विश्वासमतावरील मतदानात सहभागी होणार नाही,” असे रविवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. यामुळे आपल्या पक्षाच्या धोरणाबाब संदिग्धता निर्माण होत असल्याची जाणीव बहुधा मायावतींना झाली असावी. म्हणून रविवारी संध्याकाळीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले की, महेश यांना सोमवारी कुमारस्वामी यांच्या बाजूने मतदान करण्यास सांगण्यात आले आहे.

महेश यांना कुमारस्वामी यांनी आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळात घेतले होते. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि बसपमध्ये जागा वाटपावरून बिनसल्यामुळे त्यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री म्हणून राजीनामा दिला होता. तरीही महेश यांनी सरकारला पाठिंबा कायम ठेवला होता. मात्र गुरुवारी व शुक्रवारी कर्नाटक विधानसभेतील नाट्य शिखराला पोचले असताना बेपत्ता झालेल्या 20 सदस्यांमध्ये तेही होते.

आता गंमत पाहा. आनंद कुमार यांच्यावर पहिली कारवाई उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी काही काळ झाली होती. मध्ये काही काळ गेला. त्यानंतर कर्नाटकात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असताना पुन्हा आनंद कुमार यांची संपत्ती जप्त करण्यात आली. त्यानंतर बसपचे कर्नाटकातील आमदार भाजपविरोधी पक्षापासून हातभर अंतर राखण्याची भाषा करतात. हे सगळे मायावतींच्या सांगण्यावरूनच होत असल्याचेही ते सांगतात. अखेर महेश यांच्या पाठिंबा देण्यानेही सरकार वाचत नाही, असे पाहिल्यावर मायावती त्यांना कुमारस्वामींच्या बाजूने मतदान करायला सांगतात. यावरून लोक काय ते समजतात.

कधी एकेकट्याने तर कधी युत्या करून अभूतपूर्व यश मिळवून भारतीय राजकारणात मायावती यांनी एक आदर्श उभा केला. मात्र ‘माया’ जमवण्याच्या नादात त्या मायाजाळात अडकत गेल्या. आता याच मायाजाळाचा वापर करून भाजप त्यांना खेळवत आहे. आनंद कुमार व कर्नाटकातील नाट्याने यावर पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे!

Leave a Comment