वासे फिरलेल्या घराची घरघर


एक काळ होता की पाकिस्तान हा देश अमेरिकेचा बगलबच्चा मानला जायचा. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाचे सैन्य अफगाणिस्तानात शिरले होते. तेव्हा रशियाच्या विरोधात तळ हवा म्हणून अमेरिकेने पाकिस्तानचे पोटच्या मुलाप्रमाणे अगदी कौडकौतुक केले. भारतात त्याने पोसलेल्या दहशतवाद्याकडेही दुर्लक्ष केल. मात्र आज तोच पाकिस्तान अमेरिकेला अगदी नकोसा झाला असून आता त्याला सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. याला काळाचा महीमा म्हणतात.

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. इम्रान यांचा हा तीन दिवसांचा दौरा असून या दौऱ्यातून पाकिस्तानला खूप आशा आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ते भेटणार आहेत.या भेटीत संरक्षण, व्यापार आणि कर्जाच्या मुद्द्यावर चर्चा होईल. मात्र अमेरिकेत प्रवेश करत असताना इम्रान यांच्या स्वागताला अमेरिकी सरकारमधील एकही मोठा नेता आला नाही. एखाद्या किरकोळ व्यक्तीप्रमाणे कतार एअरवेजच्या विमानाने इम्रान खान अमेरिकेत पोहोचले. त्यामुळे सध्या ट्विटरवरील वापरकर्त्यांनी त्यांची पुरती खिल्ली उडवली. त्यामुळे पहिल्याच घासाला खडा लागावा असे झाले.

इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाने कतार एअरवेजच्या विमानातून उतरणाऱ्या इम्रान यांचा व्हिडीओ ट्विट केला. यात खान हे एखाद्या सामान्य व्यक्तीसारखे विमानातून उतरताना दिसतात. विमानतळावर त्यांना घ्यायला केवळ पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते. अमेरिकेचे रहिवासी असलेल्या काही पाकिस्तानी लोकांनी त्यांचे स्वागत केले.

पाकिस्तानची फजिती इथेच थांबली नाही. अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलताना बलुचिस्तान समर्थकांनी पाकिस्तानविरोधी घोषणा देऊन त्यांची पुरती अप्रतिष्ठा केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले असताना अनिवासी भारतीय आणि भारतीय मूळ असलेल्या नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यात मोदी यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. त्यांच्या मॅडिसन स्व्क्वायर येथील कार्यक्रमाची तुलना तर एखाद्या रॉक स्टारच्या मैफिलीशी केली गेली. त्याचीच नक्कल करत इम्रान खान यांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अनिवासी पाकिस्तानी नागरिकांना इम्रान खान संबोधित करत होते. त्याच वेळेस काही बलुचिस्तान समर्थक आपल्या खुर्च्यांवरून उठून उभे राहिले आणि त्यांनी इम्रान खान यांच्यासमोरच पाकिस्तानविरोधी घोषणा द्यायला सुरूवात केली. अमेरिकेत राहणारे बलूच अनेक वर्षांपासून पाकिस्तानी सेनेकडून बलुच जनतेवर होणारे अत्याचार, अपहरण आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या विरोधात आवाज उठवत आहेत. पाकिस्तानी सेना करत असलेल्या अत्याचारांबाबत ट्रम्प यांनी मदत करावी, यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बलुच कार्यकर्ते मोहीम राबवत आहेत. इतकेच नाही तर मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) आणि अन्य अल्पसंख्यकांच्या संघटनांनीही ट्रम्प व इम्रान यांच्या भेटीआधी वॉशिंगटन डीसीत निदर्शने केली.

ट्रम्प यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांनी पाकिस्तानवर दबाव आणला असून दहशतवादाविरोधात पाकिस्तानने कारवाई करावी, असा आग्रह धरला आहे. मुळात इम्रान यांना व्हाईट हाऊसला भेट देण्यासाठी आमंत्रण देऊन अमेरिकेने “संबंध सुधारण्यासाठी दार उघडे असल्याचा” संदेश दिला आहे, असे अमेरिकी सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याचे पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने म्हटले आहे.

पाकिस्तानला पूर्वी अमेरिकेकडून भरपूर लष्करी मदत मिळत होती. ती सध्या निलंबित आहे. ट्रम्प सरकारने जानेवारी 2018 मध्ये पाकिस्तानला सुरक्षा सहाय्य स्थगित केले आणि दहशतवादाविरोधात पावले उचलल्याशिवाय ही मदत देणार नसल्याचेही ठणकावून सांगितले. दुसरीकडे पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात असून कसेबसे तग धरून आहे. जागतिक व्यासपीठावरही पाकिस्तान एकटा पडला आहे. त्यामुळे त्याच्यापुढे आर्थिक संकट एवढे गंभीर आहे, की त्याची कोंडी फोडण्यासाठी तोंडदेखलेपणाने का होईना दहशतवाद्यांविरोधात कारवाई करतो आहोत, हे दाखवण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कर्जाच्या बोजाखाली सापडली असून पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. लोकांना टोमॅटो आणि चहासारख्या वस्तू मिळण्याचीही मारामार झाली आहे. एक प्रकारे पाकिस्तानच्या अस्तित्वालाच घरघर लागली आहे. त्याचेच प्रतिबिंब अमेरिकेकडून दिल्या जाणाऱ्या या अपमानास्पद वागणूकीत पडले आहे. घर फिरले की घराचे वासे फिरतात म्हणतात. पाकिस्तानची स्थिती तशीच झाली आहे.

Leave a Comment