का अपयशी ठरते प्रत्येक युद्धात अमेरिकी सैन्य?


अमेरिकेचे सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली, शस्त्रसज्ज आणि घातक मानले जाते. या सैन्याच्या बळावरच तर अमेरिका उठसूठ कोणत्याही देशात हस्तक्षेप करते. मात्र याच सैन्याला दुसऱ्या महायुद्धानंतर एकाही युद्धात निर्विवाद विजय मिळवता आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सैन्याच्या या अपयशावर आता अमेरिकी तज्ञच शंका उपस्थित करू लागले आहेत आणि असे का होतेय याची कारणमीमांसाही त्यांनी करायला सुरूवात केली आहे.

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण तज्ञांनी आणि सैन्य इतिहासकारांनी व अध्यक्षांनीही अमेरीकेची सेना सशस्त्र सेनांच्या इतिहासात सर्वाधिक भयंकर सेना असल्याचे सांगायला सुरूवात केली. हळूहळू ही विचारसरणी अमेरिकी समाजात सर्वत्र पसरली आणि सर्वांचा यावर विश्वास बसू लागला. असे असतानाही प्रत्येक युद्धात अमेरिकी सैन्य का अपयशी ठरतेय? अमेरिकेच्या “डेली बीस्ट” या संकेतस्थळाने आपल्या लेखात या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

या संकेतस्थळावर जेम्स वॉरेन या लेखकाने म्हटले आहे, की “शीतयुद्धाच्या काळात रशियाने आपल्याकडे अमेरिकेच्या तोडीस तोड उपकरण व शस्त्रे असल्याचा दावा केला होता. हा दावा काही प्रमाणात खराही होता. मात्र सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर आणि 1990-91 मध्ये इराक युद्धानंतर कोणाही लष्करी शास्त्राच्या विद्यार्थ्याने अमेरिकी सैन्याच्या वरचढपणाची छाननी करण्याचा प्रयत्न केला नाही.”

अमेरिकेची सध्याची सैन्यक्षमता ही इतिहासातील सर्वाधिक शक्तिशाली सेना असल्याचे मानले जाते. रोमन साम्राज्यानंतर एवढी शक्ती असलेले सैन्य झालेले नाही, असे अमेरिकी अधिकारी अभिमानाने सांगतात. जगातील सर्वाधिक खर्च होणारी सेना असल्याचा मानही अमेरिकेकडे जातो. अमेरिकेने यावर्षी किमान 650 अब्ज डॉलरचा खर्च केला असून अमेरिकेनंतरच्या सात देशांच्या एकूण संरक्षण तरतुदींएवढा हा खर्च आहे.”

कोरिया युद्ध, त्यानंतर व्हिएतनामचे युद्ध आणि मग अफगाणिस्तानातील युद्ध या सर्वांमध्ये अमेरिकी सैन्याच्या हाती काहीही लागले नाही. या अपयशाचा उल्लेख करून वॉरेन म्हणतात, “या सर्व युद्धांवर नजर टाकल्यास आपल्या मनात एक विचित्र व महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे जगातील व इतिहासातील सर्वात भयानक व विनाशक सेना आपल्या युद्धांमध्ये विजयी का होत नाही?”

उदाहरणार्थ, व्हिएतनाम युद्ध हे व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया या देशांमध्ये लढले गेले होते. या युद्धाचा कालावधी नोव्हेंबर 1955 ते एप्रिल 1975पर्यंत मानण्यात येतो. हे युद्ध उत्तर व्हिएतनाम व त्याचे कम्युनिस्ट सहकारी विरुद्ध दक्षिण व्हिएतनाम, अमेरिका व त्यांचे कम्युनिस्ट-विरोधी सहकारी असे लढले गेले. आग्नेय आशियामधील वाढत्या कम्युनिस्ट शक्तीला रोखणे हा अमेरिकेचा ह्या युद्धात पडण्याचा हेतू होता. सुमारे जवळजवळ 20 वर्षे चाललेल्या ह्या युद्धात अखेरीस अमेरिकेला माघार घ्यावी लागली व 58,220 सैनिक गमावल्यानंतर 15 ऑगस्ट 1973 रोजी अमेरिकेने आपले सर्व सैन्य ह्या युद्धामधून काढून घेतले.

याचे कारण सांगताना वॉरन यांनी अनेक तज्ञांचा हवाला देऊन म्हटले आहे, की याचे मूळ अमेरिकी सैन्याच्या संस्कृतीत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर, विशेषतः शीतयुद्धानंतर, अमेरिकेचे बहुतेक शत्रू हे गैर सरकारी व बंडखोर होते. त्यांना पारंपरिक सेनांशी लढण्याचा मोठा अनुभव होता. आधुनिक हत्यारे हातात घेतलेले मात्र पारंपरिक प्रशिक्षण घेतलेल्या अमेरिकी सैनिकांना या बंडखोरांशी मुकाबला करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. व्हिएतनाम युद्धात ही स्थिती अगदी स्पष्टपणे पाहायला मिळाली. त्याच प्रकारे इराक युद्धात बगदादवर सहज ताबा मिळवल्यानंतरही अमेरिकी सेनेला एका गुंतागुंतीच्या विद्रोहाचा सामना करावा लागला आणि तिथे ही असहाय्य दिसली.

लष्करीशास्त्राच्या अभ्यासकांच्या मते, अलीकडच्या युद्धांमध्ये अमेरिकी सैन्याचे पराजय होण्याचे एक मुख्य कारण या सैन्याचा अहंकार आहे. अमेरिकी संसद सदस्य व सैन्याधिकाऱ्यांनी नेहमीच आपल्या शत्रूला कमजोर समजले आहे. विशेषतः शत्रूच्या चिकाटीने लढण्याच्या शक्तीबाबत त्यांचे आकलन नेहमीच चुकीचे ठरले आहे. डोमेनिक टेरेनी या राजकीय भाष्यकर्त्याने गमतीने असे म्हटले आहे, की “आमच्याकडे शक्ती आहे आणि त्यांच्याकडे संकल्पशक्ती आहे.”

त्यामुळेच जेव्हा प्रबळ इच्छाशक्ती आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाचा मुकाबला होतो तेव्हा प्रशिक्षण हारते, असे मानायला हरकत नाही. फक्त शस्त्रे आणि मनुष्यबळ असून चालत नाही तर जबरदस्त इच्छाशक्तीही जिंकण्यासाठी हवी असते. ससा आणि कासवाच्या कथेचीच ही आधुनिक आवृत्ती म्हणता येईल.

Leave a Comment