विरोधकांची समाप्ती – अमित शहा ईस्टायल


भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी अमित शहा आल्यापासून भाजपला विस्ताराचे डोहाळे लागले आहेत. समोर येईल त्या पक्षाला एक तर नेस्तनाबूत करून किंवा त्याच्या सदस्यांना आत्मसात करून भाजपने जवळपास एकछत्री अंमल सुरू केला आहे. ही स्थिती कशी आली, याची एक चुणूक एका महिला खासदाराने केलेल्या गौप्यस्फोटामुळे मिळाली आहे. ही खासदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकप) आहे, हे विशेष!

सध्या भाजपला काहीही करून राज्यसभेत आपल्या सदस्यांची संख्या वाढवायची आहे. त्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. भाजपची धाव कुठपर्यंत जाऊ शकते, हे त्रिपुराच्या खासदार झरना दास यांनी दाखवले आहे. एका कामाच्या संदर्भात भेटायला गेलेल्या दास यांना गृहमंत्री अमित शहा यांनी चक्क भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. स्वतः दास यांनीच त्याची माहिती दिली आहे. शहा यांनी दास यांना खुलेआम भाजपमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला. तो अर्थातच दास यांनी नाकारला.

झरना दास या त्रिपुरातील एकमेव राज्यसभा खासदार आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, 16 जुलै रोजी त्या शहा यांना भेटण्यासाठी संसदेतील त्यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. आपल्या मतदारसंघातील पंचायत निवडणुकांमध्ये होत असलेल्या हिंसक घटनांशी संबंधित निवेदन त्यांनी शहा यांच्याकडे सोपवले आणि कारवाई करण्याची मागणी केली.

दास यांच्या म्हणण्यानुसार, “शाह मला म्हणाले, की तुम्ही या पक्षात (माकप) का आहात? तुम्ही आमच्या पक्षात (भाजप) या.” मी गृहमंत्र्याला भेटायला गेले होते, भाजप अध्यक्षांना नाही. मात्र मला शाह हे भाजप अध्यक्षांप्रमाणेच व्यवहार करत असल्याचे जाणवले, असे त्या म्हणाल्या.

“ते गंमत करत होते की अन्य काही, हे मला माहीत नाही. मात्र मी त्यांना सांगितले, की मी माकपची सदस्य आहे आणि आमच्या पक्षाचा एकच सदस्य असला तरी मी भाजपशी लढत राहीन.” झरना दास यांचा कार्यकाळ 2022 पर्यंत आहे. माकप हा वैचारिकदृष्ट्या भाजपचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जातो. अशा पक्षाच्या खासदाराला प्रवेशाचा प्रस्ताव देण्यासाठी धाडस लागते. ते शहांनी दाखवले.

अर्थात भाजपची राज्यसभेच्या सदस्यांची ही खरेदी पहिली नाही. अगदी अलीकडे जून महिन्यात तेलुगु देसम पक्षाच्या चार खासदारांनी भाजपशी घरोबा केला होता. त्यानंतर लोकदलाचे खासदार रामकुमार कश्यप हेही भाजपच्या तंबूत शिरले. काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार नीरज शेखर यांनीही पक्षाला रामराम करत भाजपमध्ये औपचारिक प्रवेश केला होता.
राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 245 असून सध्या भाजपचे 78 खासदार आहेत, तर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 115 खासदार आहेत. पाच जागा रिकाम्या आहेत. राज्यसभेत आपले बहुमत असावे, यासाठी दीर्घकाळापासून भाजपची धडपड सुरू आहे. त्यासाठी त्याला 123 खासदार हवे आहेत.

केवळ राज्यसभाच नव्हे तर संपूर्ण देशाला विरोधी पक्षांपासून मुक्त करण्याचे मिशन भाजपने सुरू केले आहे. कर्नाटकात तर या नाट्याने कळसाध्याय गाठला असून तेथे तासा-तासाला चित्र बदलत आहे. भाजपच्या राजकीय ध्येय-धोरणांबद्दल मतभेद असू शकतीलही मात्र ज्या चिकाटीने आणि सातत्याने त विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करतात त्याला तोड नाही. हे असे प्रयत्न चालू आहेत म्हणूनच भारतातील 52 टक्के भूभागावर भारतीय जनता पक्षाची सत्ता असून कॉंग्रेस अवघ्या 6 टक्के भूभागाएवढा मर्यादित आहे. त्यातही गोवा आणि कर्नाटकासारखी छापेमारी करून काँग्रेसला आणखी कमजोर करण्यात कोणतीही कसूर भाजपने ठेवलेली नाही.

भाजपची स्थापना 1980 साली झाली. अन्य पक्षांच्या तुलनेत कमी कालावधीत भाजपने केंद्रात एकहाती सत्ता मिळविली. हे शक्य झाले ते पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे तसेच विरोधकांमध्ये फोडाफोड करून त्यांना खच्ची करणाऱ्या शहा यांच्यासारख्या धोरणी नेत्यांमुळे. काँग्रेसमुक्त भारत करून आगामी 25 वर्षे भाजपचे सरकार या देशावर राहिल हे पक्षाचे ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी भाजपला अजून भौगोलिक व सामाजिक विस्तार करण्याची गरज आहे. मात्र शहा यांच्यासारख्या नेत्यांनी असेच काम सुरू ठेवले तर ते स्वप्न साकार होणे अशक्यही नाही.

Leave a Comment