दिव्यांग व्यक्तींना भोजन भरवणार ‘फूड बडी’


आपल्या दोन्ही हातांच्या सहाय्याने आपली दिवसभराची कितीतरी कामे आपण लीलया पार पाडत असतो. पण दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत बोलायचे झाले, तर हीच सहजगत्या पार पाडली जाणरी सोपी कामे हातांच्या विना किती अवघड ठरू शकतात याची कल्पना आपल्याला नसते. अश्याच व्यक्तींसाठी आयआयटी गांधीनगरच्या विद्यार्थ्यांनी एक नवे उपकरण तयार केले असून, हे गुगलवरच्या ‘अॅलेक्सा’ च्या माध्यमातून चालविले जाऊ शकणार आहे. हे उपकरण दिव्यांग व्यक्तीला चमच्याने भोजन भरविण्यासाठी बनविण्यात आले असून, या उपकरणाचे ‘फूड बडी’ असे नामकरण करण्यात आले आहे. ‘फूड बडी’चे पेटंट घेण्यात येत असून, त्यासंबंधी औपचारिक प्रक्रिया सुरु झाली असल्याचे समजते. लवकरच हे उपकरण बाजारामध्ये उपलब्ध होऊन दिव्यांग व्यक्तींना याचा उपयोग होईल अशी खात्री या विद्यार्थांना आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झालेली पहावयास मिळत आहे. मनुष्याप्रमाणेच सर्व व्यवहार आणि दैनंदिन कार्येही करू शकणारे रोबोट्स तयार करण्यासाठी सातत्याने नवे शोध सुरु आहेत. गुगलचे अॅलेक्सा देखील याच शोधांचा परिणाम असून, अॅलेक्सा बाजारामध्ये आणल्या गेल्याच्या काही काळातच या उपकरणाने अपार लोकप्रियता मिळविली. आता आपल्याला आवडती गाणी लावण्यापासून घरातील दिवे-पंखे बंद करण्यापर्यंत सर्व कामांना अॅलेक्साचा हातभार लागलेला पहावयास मिळत असतो. नव्याने तयार करण्यात आलेला ‘फूड बडी’ देखील अॅलेक्साच्या द्वारे दिव्यांग व्यक्तीची मदत करणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अश्या प्रकारच्या उपकरणांची किंमत सर्वसामान्यांना न परवडणारी असते. मात्र ‘फूड बडी’ तयार करण्यासाठी स्वस्त पण उत्तम गुणवत्ता असलेली यंत्रे वापरण्यात आली असल्याने याची किंमत सर्वसामान्यांना परवडण्याजोगी असल्याचे समजते.

Leave a Comment