आपण मंगळग्रहवासी असल्याचा रशियन युवकाचा दावा !


बोरिस किप्रियानोविच रशियामधील लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. तो सात वर्षांचा असताना, ‘बोरीस्का’, या नावाने लहानग्या बोरिसला सर्व ओळखत असत. त्या काळी आपण मंगळ ग्रहावर असताना आपले आयुष्य कसे होते याच्या बोरिसने सांगितलेल्या कहाण्या सर्वांना थक्क करून सोडीत होत्या. बोरीसच्या या कथा ऐकून थक्क झालेल्या प्रेक्षकवर्गामध्ये गेनाडी बेलीमोव्ह नामक एक प्राध्यापकही होते. त्यांनी बोरिसचे वक्तव्य, तो कथन करीत असलेले सर्व अनुभव आपल्याजवळ चित्रित करून घेतले. त्यांनी केलेले हे चित्रीकरण अर्थातच व्हायरल झाले, आणि लवकरच रशियातील मुख्य वर्तमानपत्रांमध्येही या तथाकथित ‘मंगळ ग्रहवासियाची’ चर्चा चांगलीच रंगली होती. बोरिस आता बावीस वर्षांचा युवक आहे. आपला जन्म पृथ्वीवर होण्याआधी आपण मंगळावर रहात असल्याचे बोरिसचे म्हणणे आहे. वयाच्या सातव्या वर्षापासूनच आपण मंगळ ग्रहावर रहात असल्याचे बोरिस सांगत असे. त्याकाळी देखील अंतराळ, अंतराळातील ग्रह, तारे, यांच्याविषयी बोरिस सतत बोलत असे. ऐकणारा आश्चर्याने थक्क व्हावा अशा कथा बोरिस सांगत असे.

बोरिसचा जन्म १९९६ साली, जानेवारी महिन्यामध्ये झाला. जन्मतःच आपल्या मुलामध्ये काही खास क्षमता असल्याचे त्याच्या आईच्या लक्षात येऊ लागले. जन्म झाल्यानंतर केवळ पंधरा दिवसांतच छोटासा बोरिस त्याची मान स्वतः होऊन सावरू लागला होता. सर्वसाधारणपणे एखादे बाळ मान सावरू लागण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागतो, हे लक्षात घेता, बोरिसची प्रगती फारच झपाट्याने होत होती. वयाच्या अवघ्या दीड वर्षांच्या आताच बोरिस संपूर्ण वाक्ये अस्खलित बोलू लागला होता. वयाची दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत बोरिस लिहू-वाचू लागला होता, आणि उत्तम चित्रेही काढू लागला होता. इतकेच नव्हे तर आणखी थोडे मोठे झाल्यानंतर बोरिसने आपण होऊनच ग्रह, तारे, अवकाश या सर्व विषयांबद्दल बोलणे सुरु केले होते. बोरिस सात वर्षांचा असताना त्याचे आईवडील त्याला कॅम्पिंग ट्रीपसाठी घेऊन गेले असता, तिथे उपस्थित सर्व मंडळींच्या समोर बोरिसने मंगळ ग्रहावर रहात असतानाचे आपले अनुभव कथन करण्यास सुरुवात केली.

बोरिसचे अनुभव जेव्हा वैज्ञानिकांच्या पर्यंत पोहोचले, तेव्हा मंगळावर राहणाऱ्या तथाकथित मंगळ वासियांबद्दलची बोरिसने दिलेली माहिती वैज्ञानिकांनाही थक्क करून सोडणारी होती. बोरिसच्या मते मंगळावर राहणारे लोक किमान सात फुट उंच असून हे लोक जमिनीखाली राहतात. श्वास घेण्यासाठी या लोकांना कार्बन डाय ऑक्साईड वायू देखील चालू शकत असून, हे सर्व लोक अमर असल्याचे बोरिसचे म्हणणे होते ! मंगळावर रहात असताना आपण वैमानिक असून पृथ्वीवर अनेकदा आलो असल्याचे सांगत इजिप्त देशाला सर्वाधिक वेळा भेट दिली असल्याचेही बोरिस म्हणतो. मात्र मंगळावर त्यावेळी अणुयुद्ध झाल्याने ग्रहाचे मोठे नुकसान झाल्याचे बोरिस म्हणतो. कदाचित म्हणूनच आताच्या काळामध्ये मंगळावर जीवसृष्टी सहज सापडत नसल्याचे बोरिसचे म्हणणे आहे. मात्र मंगळावर जीवसृष्टी अजूननी अस्तित्वात असून, योग्य ठिकाणी शोधल्यास ही सृष्टी नक्की सापडेल याची खात्री बोरिसला वाटते.

Leave a Comment