पावसाळ्यामध्ये आहारातून हे अन्नपदार्थ करा वर्ज्य, सांगतो आयुर्वेद


भारतामध्ये ऋतुमानानुसार आहाराची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. म्हणूनच ठराविक ऋतुंमध्ये काही अन्नपदार्थ आहारामध्ये समाविष्ट केले जात असतात, तर ठराविक अन्नपदार्थ वर्ज्य केले जात असतात. असे करण्यामागे शास्त्रीय कारणे आहेत. हे आहार नियम पाळल्याने ऋतुमानातील बदलांचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम न होता, शरीर निरोगी राहण्यास मदत होत असते. आयुर्वेदाने देखील या आहारनियमांचे समर्थन केले आहे. हे आहारनियम शरीरातील कफ, वात आणि पित्त या त्रिदोषांवर अवलंबून आहेत. यामध्ये वात, शारीरिक हालचालींचे, पित्त शरीराच्या चयापचय शक्तीचे तर कफ शरीररचनेचे प्रतीक आहेत. जसजसे ऋतुमान बदलते, तसतसे या त्रिदोषांमध्येही परिवर्तन घडून येते. म्हणूनच बदलत्या ऋतूमनानुसार आहारामध्ये बदल केले गेल्यास त्रिदोष संतुलित राहण्यास मदत होऊन शरीर रोगमुक्त राहते. पावसाळ्यामध्येही आहारामधील कोणते पदार्थ वर्ज्य केले जावेत याबद्दल आयुर्वेदाने मार्गदर्शन केले आहे.

श्रावण आणि भाद्रपद महिन्यांमध्ये शरीरातील वाताचे प्रमाण वाढलेले असते. तसेच पित्तरसही अधिक सक्रीय झालेले असतात. याच कारणास्तव वात आणि पित्त वाढण्यास कारणीभूत ठरणारे पदार्थ आहारातून वर्ज्य करण्याचा सल्ला आयुर्वेद देतो. हिरव्या पालेभाज्यांमुळे वात वाढत असून, श्रावणामध्ये हिरव्या भाज्या कमी प्रमाणांत सेवन केल्या जाव्यात. तसेच भाद्रपद महिन्यामध्ये आंबविलेले पदार्थ खाल्ल्यानेही शरीरामध्ये पित्तवृद्धी होत असते. म्हणूनच या दिवसांमध्ये आंबट पदार्थ कमी खाल्ले जावेत. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहावयाचे झाल्यास पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्यांवर जास्त कीड दिसून येते. कीड लागलेल्या भाज्या खाल्ल्याने अनेक तऱ्हेचे आजार उद्भवण्याचा संभव असतो. म्हणूनच या दिवसांमध्ये पालेभाज्या जास्त न खाण्याचा सल्ला आहारतज्ञ देत असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्या आणि आंबविलेले पदार्थ आहारातून कमी करावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment