जाणून घेऊ या सीएचपीव्ही (चांदीपुरा व्हायरस) विषयी


१९६६ साली महाराष्ट्रातील चांदीपुरा गावामध्ये डेंग्यूची साथ आलेली असताना दोन रुग्णांच्या रक्ततपासणीमध्ये, या रुग्णांना वेगळ्याच व्हायरसची लागण झाल्याचे निदान झाले. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मधील दोन संशोधकांनी हे निदान केले असून त्यांनी या व्हायरसचे ‘चांदीपुरा व्हायरस’ असे नामकरण केले. या व्हायरसचा शोध लागल्यानंतर सुमारे तीस वर्षांच्या काळामध्ये या व्हायरसची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र २००२ साली या व्हायरसने पुन्हा डोके वर काढले. त्यावेळी दक्षिण भारतामध्ये या व्हायरसचे संक्रमण ३२९ मुलांना होऊन त्यांपैकी १८३ मुलांचा एन्सिफलायटिसमुळे मृत्यू झाला. त्यावेळी या व्हायरसचे संक्रमण झालेल्या रुग्णाची तब्येत झपाट्याने खालावत असून सुरुवतीला ताप येऊन त्यानंतर रुग्णाची प्रकृती अधिकाधिक गंभीर होऊन रुग्ण कोमामध्ये जात असल्याचे, आणि सरतेशेवटी रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे आढळून आले होते. अलीकडच्या काळामध्ये या व्हायरसने पुन्हा डोके वर काढले असून, गुजरात राज्यातील भायाली गावातल्या पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. गुजरात राज्यभरातून अन्य पाच रुग्णांनाही या व्हायरसची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. या व्हायरस विषयी काही महत्वाच्या बाबी जाणून घेऊ या.

महाराष्ट्राच्या चांदीपुरा गावामध्ये या व्हायरसने ग्रस्त रुग्ण सर्वप्रथम आढळल्याने या व्हायरसचे नामकरण चांदीपुरा व्हायरस असे करण्यात आले असून या व्हायरसची मूळ ‘कॅरियर’ असणारी ‘फ्लेबोटोमाईन सँडफ्लाय’ भारताव्यतिरिक्त सेनेगल आणि नायजेरिया प्रांतांमध्ये ही आढळते. या व्हायरसचे संक्रमण झाल्याने मेंदूला सूज येऊन फ्ल्यू सम लक्षणे रुग्णामध्ये आढळून येतात. ही लक्षणे काही काळातच गंभीर स्वरूप धारण करत असून, रुग्ण कोमामध्ये जातो आणि त्याचा मृत्यू होण्याचा धोका आणखी वाढतो.
या आजाराबद्दल लक्षात घेण्यासारख्या विशेष गोष्टी अश्या, की या आजाराची लागण दोन ते सोळा वर्षे वयातील मुलांना होण्याची शक्यता अधिक असते. या व्हायरसचे कॅरियर असणारा सँडफ्लाय नामक कीटक किंवा काही बाबतीत डासांच्या मार्फतही या व्हायरसचे संक्रमण होऊ शकते. पावसाळ्यामध्ये आणि पावसाळा सुरु होण्याच्या काही काळ आधीपासून या व्हायरसची लागण होण्यास सुरुवात होते. या व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णाला त्वरित उपचार न दिले गेल्यास त्याचा मृत्यू होण्याचा धोका असतो. या व्हायरसची लागण झाली असल्यास रुग्णाला अचानक खूप जास्त ताप येऊ लागतो. तसेच डोकेदुखी, अधून मधून शुद्ध हरपणे अश्या समस्याही आढळून येतात. आजाराने गंभीर रूप धारण केले तर रुग्णाला फिट्स येऊ शकतात. तसेच सतत उलट्या, मळमळ अश्या तक्रारीही दिसून येतात.

या व्हायरस पासून होणारे संक्रमण टाळण्यासाठी विशिष्ट लस किंवा औषधे बाजारामध्ये उपलब्ध नसली, तरी रोगाची लक्षणे आढळून आल्यानंतर रुग्णाला त्वरित डॉक्टरांकडे नेणे अतिशय आवश्यक आहे. रोगाचे निदान वेळेवर झाले असता, ज्याप्रमाणे लक्षणे दिसून येत आहेत त्यांनुसार उपचार करणे शक्य होत असून, त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे या रोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतःच्या मनाने औषधोपचार न करता त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment