गुगल प्ले स्टोअरवर आहेत 150 पेक्षा अधिक बनावट जिओ अॅप


आतापर्यंत काही बनावट अॅप गुगल प्ले स्टोअरवर जास्त प्रमाणात आढळून आल्याच्या तक्रार समोर आल्या आहेत. तर ताज्या घटनेनुसार प्ले स्टोअरवर आता रिलायन्स कंपनीच्या जिओबाबतचे जवळजवळ 150 बनावट अॅप लॉन्च करण्यात आले आहेत. जाहिराती दाखवून अशा पद्धतीचे अॅप डेव्हलपर्संना पैसे कमावून देण्यासाठी मदत करत आहेत. त्याचसोबत हे अॅप युजर्सने डाऊनलोड करावे म्हणून फ्री-डेटा त्यांना मिळणार असल्याची भुरळ पाडली जात आहे.

याबाबत सायमॅन्टेकने (Symantec) जाहीर केलेल्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, 152 बनावट अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. खऱ्या जिओच्या अॅपसह या अॅपचा लूक एकदम तंतोतंत मिळता जुळता आहे. युजर्सला असे अॅप फुकटात डेटा देत आहोत अशी भुरळ घालतात. त्याचसोबत हे अॅप युजर्सने डाऊनलोड केल्यानंतर एका बेवपेजवरुन त्यांना एकापाठून एक अशा विंडोज सुरु होतात. त्याचसोबत विविध नावे या बनावट अॅपसाठी देण्यात आली असून त्यासाठी पॅकेजेस ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये युजर्सला 25GB ते 125 GB डेटा देण्यात येत असल्याचे सांगितले जाते. यामुळे एवढ्या मोठ्या इंटरनेट पॅकच्या हव्यासापायी युजर्स हे बनावट अॅप डाऊनलोड करत आहेत.

तसेच अशा बनावट अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या आतापर्यंत 40 हजाराच्या घरात जाऊन पोहचली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत हे अॅप डाऊनलोड करण्यात आले आहेत. हे बनावट अॅप अद्याप युजर्सचा डेटा चोरी करत नाही पण या अॅपमुळे स्मार्टफोन धिम्या गतीने काम करतो.

Leave a Comment