
देशभरात आता पाऊस हा कार्यरत झाला आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढत चालणे कठीण होऊन बसते. तर मुख्य रस्त्यांवर पावसामुळे गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळतात. पण बाईकस्वरांना पावसाळ्याच्या दिवसात याचा मोठा फटका बसून रस्ते निसरडे झाल्याने अपघात होण्याची शक्यता फार असते. त्यामुळे तुम्ही जर पावसात बाईकवरुन प्रवास करत असल्यास अधिक सावधगिरी बाळगा.
पावसाळ्याच्या दिवसात बाईक चालवताना जरा जपूनच
तर बाईकस्वारांना पावसाळ्यात बऱ्याच वेळा वाहतुककोंडीत अडकून राहायला आवडत नाही. त्यामुळे ते रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या छोट्या मार्गाने आपली बाईक तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा परिस्थितीत सावधगिरी न बाळगल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात चुकूनसुद्धा ‘या’ गोष्टी करणे टाळा.

तुमच्या बाईकचे टायर्स जर खराब झाले असतील ते प्रथम बदलून घ्या. कारण खराब झालेल्या टायर्समध्ये पावसाळ्यात तुम्ही बाईक चालवल्यास प्रवासादरम्यान काही अडथळे येऊ शकतात. त्याचसोबत निरसड्या झालेल्या रस्त्यांवर टायर्सची पकड बसत नाही.
गाडी पावसाळ्यात अजिबात वेगाने चालवण्याचा प्रयत्न करु नका. कारण रस्त्यांवर पावसाळ्यात घर्षणाची क्षमता कमी झालेली असते. त्याचसोबत गाडीवरील तुमचे स्पीडचे नियंत्रण योग्य असणे फार महत्वाचे आहे. तसेच पावसाळ्यात बाईक चालवत असल्यास त्याचा स्पीड 30-40kmph एवढाच ठेवा.

रस्त्यांवरुन चालताना नेहमीच दोन गाड्यांच्यामध्ये अंतर जरुर ठेवा. खासकरुन अवजड सामानवाहू गाड्यांपासून काही प्रमाणात अंतर ठेवून चालवणे सुरक्षितचे मानले जाते. तसेच गाडीचे हेडलाईट पावसात सुरुच ठेवा. त्याचसोबत पावसाचे पाणी रस्त्यांवर भरले असल्यास त्यामधून बाईकने जाणे टाळा. कारण रस्त्याच्या बाजूला असणारी गटारे अशा परिस्थितीत उघडी ठेवली असल्यास दुर्घटना होण्याची शक्यता असते. तसेच पाण्यातून बाईक काढत असाल तर पाणी एक्जॉस्टमध्ये जाऊन बंद पडू शकते.
