समुद्री चाच्यांशी लढण्यासाठी जगाची पसंती – भारतीय बहाद्दर


भारतीय नौदलातील निवृत्त सैनिक असलेल्या अब्दुल रझाक यांना 2013 मध्ये सोमाली सागरी चाच्यांशी झालेला संघर्ष आजही आठवतो. या आठवणीने आजही त्यांच्या अंगावर काटा येतो. या संघर्षात रझाक बालंबाल बचावले. रझाक आणि आणि त्यांचे सहकारी माजी भारतीय नौसैनिक लाल समुद्रातील सोमालियाच्या किनाऱ्याजवळ तेलाच्या टॅँकरची जबाबदारी सांभाळत होते. त्याचवेळी चाच्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

जहाजाच्या सुरक्षा रक्षकांनी अनेकदा गोळीबार केला तरी चाच्यांनी या टँकरचा पाठलाग चालूच ठेवला होता. हा पाठलाग चालू असतानाच रझाक यांच्या चमूकडील दारुगोळा संपत आला होता. निव्वळ नशीब जोरावर म्हणून सागरी दरोडेखोरांनी त्या टँकरचा नाद सोडला आणि आपला मोहरा इतरत्र वळवला. आणखी थोडा वेळ ही धुमश्चक्री चालली असती तर जहाजावरील रक्षक आणि कर्मचारी सहज त्यांच्या हाती लागले असते हे त्या चाच्यांना माहीतही नव्हते.

“आम्हाला आमच्या जीवाची काळजी वाटत होती. चाचे निघून गेले नसते तर आम्ही मेलोच असतो,” असे रझाक म्हणतात.
मात्र सोमाली चाच्यांशी दोन हात करणारे रझाक हे एकमेव भारतीय योद्धे नाहीत. सागरी सुरक्षा कंपन्या आपल्या जहाजांच्या सुरक्षेसाठी भारत आणि अन्य आशियाई देशांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. या कंपन्यांना कमी खर्चात उत्तम लढवय्ये मिळतात आणि बदल्यात सशस्त्र दलातील या निवृत्त सैनिकांना नागरी जीवनात परत येण्याचा हा एक चांगला मार्ग उपलब्ध होत आहे.

आज रझाक जागतिक सागरी सुरक्षा संस्थांना निवृत्त भारतीय नौसेनिकांचा पुरवठा करणारी एक कंपनी चालवतात. या कंपन्या कमी खर्चात सुरक्षा सैनिक घेण्यासाठी भारत व अन्य आशियाई देशांकडे नजर लावून आहेत. एकीकडे सोमालियाच्या किनारपट्टीवरील चाचेगिरीत घट झाली आहे आणि सागरी सुरक्षा कंपन्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या कंपन्यांना कमी खर्चात आपले काम करावे लागत आहे.

याचा परिणाम म्हणून भारतीय सशस्त्र दलातील माजी सैनिकांना नागरी जीवनाकडे वळण्याचा एक आकर्षक मार्ग मिळाला आहे. सशस्त्र दलात 15 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या सैनिकांना या मार्गाने त्यांच्या शेवटच्या पगारापेक्षा पाचपट जास्त वेतन मिळू शकते.

“माझ्या जीवाला नेहमीच धोका होता. आम्ही परत भारतात येऊ की नाही हेही आम्हाला माहित नव्हते. माझे कुटुंब माझ्यासाठी चिंतित होते. पण माझ्या कुटुंबाला तयार करण्यासाठी माझा पगार पुरेसा होता. धोका जास्त असल्यामुळेच मला जास्त पगार मिळत असल्याचे त्यांना समजत होते,” असे रझाक यांनी डॉयट्शे वेले वाहिनीशी बोलताना सांगितले.

गेल्या काही वर्षांत आपल्या संस्थेने सागरी सुरक्षा उद्योगामध्ये 1500 भारतीय सैनिकांची भरती केली असल्याचे रझाक यांनी सांगितले.

आफ्रिकेतील हॉर्न ऑफ अफ्रिका या भागात 2000 च्या उत्तरार्धात चाचेगिरी कळसाला पोचली होती. त्यावेळी भरमसाठ खासगी सागरी सुरक्षा कंपन्या अस्तित्वात आल्या. केवळ 4 वर्षांच्या आत सुमारे 500 कंपन्या निर्माण झाल्या. धोकादायक सागरी मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना त्या सुरक्षा कर्मचारी पुरवत असत. मुख्यतः ब्रिटन, अमेरिका आणि ग्रीस अशा प्रतिष्ठित सैनिकी तुकड्यांमधून या रक्षकांची भरती करण्यात येत असे.

पुढे या उद्योगात कंपन्यांची अधिक गर्दी झाल्यामुळे छोट्या कंपन्यांनी भारत, श्रीलंका आणि अन्य आशियाई देशांतून कमी वेतन घेणाऱ्या रक्षकांची नेमणूक सुरू केली. आज या उद्योगात जवळजवळ दोन-तृतियांश कर्मचारी आशियाई आहेत. परंतु आशियाई सुरक्षा रक्षकांना त्यांच्या पाश्चात्य समकक्ष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी वेतन दिले जाते. पाश्चिमात्य अनुभवी टीम लीडरला प्रति महिना सुमारे 4,500 डॉलर मिळतात, तर त्यांच्या भारतीय समकक्ष व्यक्तीस सुमारे 2,000 डॉलर्स मिळतात. एखाद्या नवोदित पाश्चात्य कर्मचाऱ्याला दरमहा सुमारे 1,600 डॉलर्स दिले जातात, तर नवीन भारतीय रक्षकांना 750 डॉलर प्रति महिना दिले जातात. त्यातूनही जॉब एजंटचे कमिशन वजा केले जाते.

लवकरच डायप्लूस आणि अन्य मोठ्या कंपन्यांनीही हाच मार्ग चोखाळला. आज डायप्लूस कंपनीत एक तृतीयांश पेक्षा अधिक रक्षक भारतीय आहेत तर 10 टक्के श्रीलंकेचे आहेत. “भारताकडे उत्तम नौदल आहे आणि तेथील अधिकाऱ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळते. सागरी कामकाज, नौका कामकाज, सागरी सुरक्षा इत्यादी बाबत या लोकांकडे भरपूर प्रमाणात ज्ञान असते. त्यांना सागरी जीवनाच्या पद्धतीही कळतात आणि ते मच्छीमारांना चाचे समजत नाहीत,” असे या कंपनीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी दिमित्रिस मॅनियाटिस यांनी सांगितले.

दरम्यान, सोमालियाच्या किनारपट्टीवरील चाचेगिरी कमी झाल्यामुळे अनेक कंपन्यांनी गाशा गुंडाळला आहे. मात्र गेल्या महिन्यात ओमानच्या खाडीमध्ये तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यांमुळे सागरी सुरक्षा रक्षकांची मागणी वाढली आहे. तरीही अनेक कंपन्या सुरू राहण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यापैकी बऱ्याच कंपन्या तर रक्षकांना कामावरही घेत नाहीत तर केवळ भरती कंपन्यांकडून भाड्याने घेत आहेत. ते काहीही असले भारतीय बहाद्दरांना त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो आहे, हे काही कमी नाही!

Leave a Comment