क्रिकेटचा देव ‘हॉल ऑफ फेम’ने सन्मानित


नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा औपचारिकरीत्या समावेश करण्यात आला. हा क्रिकेट जगतातील एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. हॉल ऑफ फेम या मानाच्या यादीत स्थान पटकवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ५ वर्षे पूर्ण होणे गरजेचे असल्यामुळे कुंबळे आणि राहुल द्रविडचा सचिनच्या आधी हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला होता.


सचिनसह दक्षिण अफ्रिकाचा माजी वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड, ऑस्ट्रेलियाच्या माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीनसह तीन जणांचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. हॉल ऑफ फेम मध्ये स्थान मिळालेला सचिन सहावा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी बिशन सिंह बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना सहभागी केले होते.

Leave a Comment