इवल्याशा इमोजींची मोठी कहाणी!


स्मार्टफोनच्या आगमनानंतर इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज क्वचितच असा एखादा ऑनलाईन संवाद असेल ज्यात इमोजींचा वापर होत नाही. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लोक शब्द वापरण्याऐवजी इमोजींचा जास्त वापर करू लागले आहेत. केवळ भावना व्यक्त करण्यासाठी नाही, तर कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यासाठीही ही इवली-इवली चिन्हे मदतीला येतात. या इमोजींचे प्रस्थ एवढे वाढले आहे, की गुगल व अॅप्पलसारख्या कंपन्यांमध्ये त्यांच्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.

जगभरात दरवर्षी 17 जुलै हा दिवस इमोजी डे म्हणून साजरा केला जातो. तसा तो यंदाही साजरा झाला. या दिवशी अनेक कंपन्या आपल्या स्वतःच्या इमोजी जारी करतात. त्याचाच भाग म्हणून अॅप्पलने बुधवारी नव्या इमोजी सादर केल्या. यात नेहमीप्रमाणे गोंडस चेहऱ्याची आणि हावभावांची चिन्हे तर आहेतच, परंतु त्यात सांस्कृतिक वैविध्यालाही जागा देण्यात आली आहे. यात एकमेकांचा हात हातात घेतलेल्या व्यक्तींच्या इमोजी असून या व्यक्तींचे लिंग व त्वचेचा रंग यात निवड करण्याचे अनेक पर्याय देण्यात आले आहेत. अशा एकूण 75 जोड्या अॅप्पलने सादर केल्या आहेत. याशिवाय व्हिलचेअर, कृत्रिम हात व पाय असलेल्या व्यक्ती, मार्गदर्शक कुत्रा आणि श्रवणयंत्र असलेले कान अशा इमोजीही आहेत. प्राण्यांमध्ये स्लॉथ, फ्लेमिंगो, ओरांगउटान अशी चिन्हे आहेत.

आता अॅप्पलने हे पाऊल उचलल्यावर इंटरनेटवर अधिराज्य करणारा गुगल तरी कसा मागे राहील? गुगल अशा जोडप्यांच्या 71 प्रकारच्या इमोजी आणणार आहे. विशेष म्हणजे गुगल दिव्याची एक इमोजी आणणार आहे. ख्रिश्चनांच्या ख्रिसमस आणि थँक्सगिव्हिंग या सणांसोबत दिवाळी सणाच्या शुभेच्छाही त्यामुळे सहजतेने देता येतील. गुगलनेही आपली ही भेट बुधवारीच जगासमोर आणली. अॅप्पलच्या इमोजी आयफोन, आयपॅड, मॅक आणि अॅप्पल वॉचवर या महिन्याच्या शेवटी मोफत सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून वापरकर्त्यांना उपलब्ध होतील. गुगलच्या इमोजी मात्र या वर्षीच्या शेवटी अँड्रॉईड क्यूपासून फोनमध्ये दिसू लागतील.

इमोजींची सुरूवात 1990 मध्ये झाली होती. सर्वात आधी अॅप्पलने आपल्या आयफोनच्या कीबोर्डमध्ये त्यांना स्थान दिले होते. त्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यात उडी घेतली. जगप्रसिद्ध पेप्सी कंपनीने इमोजी दिवसानिमित्त 20015 मध्ये पेप्सीची इमोजी सादर केली होती. अॅप्पल, गुगल, सॅमसंग अशा कंपन्या पिक्सल कॅलेंडरच्या इमोजींचा वापर त्यांच्या उपकरणांसाठी करतात. सर्वात आधी अॅप्पलने 17 जुलै 2002 रोजी या कॅलेंडरच्या इमोजीचा वापर आपल्या कॅलेंडर अॅपसाठी केला होता. त्याला आयकॅल असे म्हणतात. त्यामुळेच 17 जुलै हा दिवस जागतिक इमोजी दिवस म्हणून साजरा केला जातो, असे इमोजीपीडिया संकेतस्थळाचे संस्थापक जेरेमी बर्ग यांचे म्हणणे आहे.

इमोजीला मराठी भावचिन्हे असा शब्द आहे. युनिकोड कन्सॉर्शियम ही आंतरराष्ट्रीय संस्था लिपिचिन्हांचे आणि भावचिन्हांचे प्रमाणीकरण करते. जगातील कोणतीही व्यक्ती इमोजी तयार करू शकते. मात्र आपल्या हातातील फोन आणि संगणकांवर ती दिसण्यासाठी या संस्थेची मान्यता आवश्यक असते. दरवर्षी अशा अनेक इमोजी इंटरनेटवर दाखल होतात आणि त्यांना ही संस्था मान्यता देते. या वर्षीच्या सुरूवातीला युनिकोड कन्सॉर्शियमने विविध वर्णांच्या जोडप्यांच्या 71 इमोजींना मान्यता दिली. सध्याच्या यूनिकोड मान्यताप्राप्त यादीनुसार, जगभरात 2,823 इमोजी वापरात आहेत.

आपल्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र सरकारलाही या संस्थेचे सदस्यत्व मिळाले आहे.त्यामुळे गुगल, फेसबुक, आयबीएम, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, सॅप आणि सीमॅन्टेक अशा कंपन्यांच्या रांगेत महाराष्ट्राला स्थान मिळाले आहे. असे सदस्यत्व प्राप्त करणारे महाराष्ट्र हे भारतातील दुसरे राज्य आहे. मराठी भाषा व संस्कृतीशी जोडलेल्या लिपिचिन्हांना आणि भावचिन्हांना (इमोजी) आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळण्यासाठी या सदस्यत्वामुळे सोपे जाणार आहे.

भारतीयांच्या दृष्टीने आणखी एक विशेष बाब म्हणजे जगभरात इमोजींचा सर्वाधिक वापर भारतीय लोक करत असल्याचे बोबल एआय या कंपनीच्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये सर्वाधिक वापरले गेलेले इमोजी हे हसून हसून डोळ्यांतून पाणी येणे आणि फ्लाईंग किस करणारे होते. अशा या दिसायला छोट्याशा मात्र कामाला जास्त येणाऱ्या इमोजींची कहाणी वाढतच जात आहे.

Leave a Comment