या राजकुमारीच्या प्रेमाखातर तेरा तरुणांनी त्यागले आपले प्राण !


आजच्या काळामध्ये शरीराच्या बाह्यरूपाला जास्त महत्व असून, सौंदर्याच्या संकल्पनाही आजच्या काळामध्ये खूपच बदलल्या आहेत. आताच्या काळामध्ये सुंदर चेहरा, रेखीव बांधा, यांना जास्त महत्व आहे. मात्र एकोणिसाव्या शतकातील सौंदर्याच्या संकल्पना आजच्या काळाच्या मानाने पुष्कळच वेगळ्या होत्या. त्याकाळी स्त्रियांमध्ये असलेला शारीरिक स्थूलपणा सौंदर्याचे लक्षण समजले जात असे. असेच सौंदर्य लाभलेली इराणची राजकुमारी ताज अल कजर सुलताना असल्याचे म्हटले जात असे.

राजकुमारी सुलताना काहीशी स्थूल होतीच, शिवाय तिच्या चेहऱ्यावर चक्क मिश्या असल्याप्रमाणे केस होते. तिच्या भुवयाही अतिशय दाट होत्या. तिच्या याच रूपाला त्याकाळी सौंदर्याची परिसीमा मानले जात असे. तिच्या या सौंदर्याची भुरळ अनेक तरुणांना पडली असून, त्यांच्या पैकी प्रत्येकाला राजकुमारी सुलतानाशी विवाह करण्याची इच्छा होती. मात्र राजकुमारी सुलतानाने यांच्यापैकी कोणाचेही विवाहप्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला. तिच्या नकाराने दुखावले जाऊन यांपैकी तेरा तरुणांनी राजकुमारीच्या प्रेमाखातर आपले प्राण त्यागले !

राजकुमारी सुलतानाने सर्वांचे विवाहासाठीचे प्रस्ताव अमान्य करण्यामागे देखील एक कारण होते. ते कारण असे, की राजकुमारी सुलताना हिचा विवाह आधीच अमीर हुसेन खान शोजा-ए-सल्तनेह यांच्याशी झाला असून, त्यांच्यापासून राजकुमारीला चार अपत्येही होती. मात्र हे विवाहसंबंध टिकू न शकल्याने राजकुमारीने घटस्फोट घेतला होता. विवाहसंबंध संपुष्टात आल्यानंतर राजकुमारी सुलतानाचे अनेक जणांशी प्रेमसंबंधही होते. यामध्ये गुलाम अली खान अजिजी अल सुलतान आणि इराणी कवी आरिफ काज्विनी यांची नावे प्रामुख्याने घेतली जात असून, यांच्याशी राजकुमारीचे असलेले प्रेमसंबंध त्याकाळी चर्चेचा विषय ठरले होते. राजकुमारी सुलताना त्याकाळी अतिशय पुढारलेल्या विचारांची असून, त्या काळी अस्तित्वात असणाऱ्या अतिशय कर्मठ समाजामध्ये देखील हिजाब न वापरणारी, आणि पाश्चात्य पोशाख परिधान करणारी महिला होती.

Leave a Comment