एरिया 51 – परग्रहवासियांचा कैदखाना की निव्वळ कल्पना?


परग्रहवासियांबाबत मानवाला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. पृथ्वीशिवाय अन्यत्र जीवसृष्टी आहे का, असा प्रश्न माणसांना शतकानुशतकांपासून पडला आहे. त्याचे उत्तर मिळविण्यासाठी तर अपोलो आणि चांद्रयानासारख्या मोहिमा विविध देशांची सरकारे राबवतात. मात्र याचे स्पष्ट उत्तर अजूनही मिळालेले नाही. दरम्यान, परग्रहवासियांबाबत अफवा मात्र प्रचंड प्रमाणात पसरल्या आहेत. या अफवांची शहानिशा करण्यासाठी लोकांनी स्वतःच एक मोहीम हाती घेतली आणि आता ही मोहीम अमेरिकी वायुसेनेसाठी डोकेदुखी ठरली आहे.

‘स्टॉर्म एरिया 51 दे कान्ट स्टॉप ऑल ऑफ अस’ ( एरिया 51 ला धडक द्या, ते आपल्या सर्वांना रोखू शकत नाहीत) असे या मोहिमेचे नाव आहे. फेसबुकवर या मोहिमेची सुरूवात झाली आणि आतापर्यंत 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी त्यात रस दाखवला आहे. ‘एरिया 51’ हा अमेरिकी वायुसेनेचा एक तळ असून तेथे 20 लाख लोकांनी बळजबरी प्रवेश मिळविण्याच्या कल्पनेनेच अमेरिकी संरक्षण खात्याची झोप उडाली आहे.

असे काय आहे या ‘एरिया 51’मध्ये? तर ‘एरिया 51’ हा अमेरिकेतील एक तळ असून त्याच्याबाबत फार थोडी माहिती उपलब्ध आहे. ही जागा एवढी गोपनीय आहे, की अमेरिका सरकारनेही केवळ काही वर्षांपूर्वीच अशी काही जागा असल्याचे मान्य केले होते. अमेरिकेच्या नकाशातही ही जागा दाखवण्यात येत नाही. या ठिकाणी एक उडती तबकडी (यूएफओ) कोसळली होती आणि त्यातून एका एलियनचा मृतदेह जप्त करण्यात आला होता. हा परग्रहवासी 4 फूट लांब होता आणि ओबडधोबड मानवासारखा दिसत होता, असे दावा 1947 साली करण्यात आला होता. एरिया 51 च्या कुठल्या तरी भागात त्यावर संशोधन चालू असल्याचे मानले जाते.

नेवाडा या शहराजवळ आणि लास वेगासपासून 80 मैल उत्तरेला एका वाळवंटात हा तळ असून तेथे जाण्यासाठी तेथील एरिया कमांडरची परवानगी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी परग्रहवासियांना (एलियन्स) कैद करून ठेवल्याचे सांगितले जाते. एलियन म्हणजे पृथ्वीशिवाय अन्य एखाद्या ग्रहावर राहणारा प्राणी. अमेरिकी शास्त्रज्ञ परग्रहवासियांवर संशोधन करतात आणि त्यासाठी परग्रहवासियांना ‘एरिया 51’मध्ये बंद करून ठेवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीला तिथे जाण्याची परवानगी नाही.

यावरूनच फेसबुकवर चर्चेला सुरूवात झाली आणि फेसबुकवर एका इव्हेंटची निर्मिती करण्यात आली. येत्या 20 सप्टेंबर 2019 रोजी हा कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले आहे. आतापर्यंत 12 लाख लोकांनी या कार्यक्रमात भाग घेण्याचे निश्चित केले असून अन्य 9 लाख जणांनी त्यात रस दाखवला आहे. “आपण सर्व जण एलियन टूरिस्ट सेंटर एरिया 51 येथे भेटूया आणि आपल्या प्रवेशाची व्यवस्था करूया. आपण नारुटोसारखे पळालो तर त्यांच्या गोळ्यांपेक्षा जास्त वेगाने पळू शकतो. या, आपण परग्रहवासी पाहू,” असे या पानाच्या माहितीत लिहिले आहे. यातील ‘नारुटो’सारखे पळणे हे एका कार्टून पात्रावरून प्रेरित आहे. नारुटो हा एक निंजा असतो आणि आपले दोन्ही हात मागे घेऊन तो वेगाने पळतो.

‘एरिया 51’बाबत फेसबुकवर एखादी अफवा उठण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. फेसबुकवर या संबंधात आधीही अनेक पेजेस आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेली ही पहिलीच मोहीम आहे. ‘स्टॉर्म एरिया 51’ या नावाने एक संकेतस्थळही बनविण्यात आले आहे. ‘समथिंग बिग इज कमिंग’ म्हणजे काही तरी मोठी घटना घडणार आहे, असे या संकेतस्थळावर लिहिले आहे. तसेच या संकेतस्थळावर एलियनची प्रतिमा असलेला टीशर्टही विक्रीसाठी ठेवला आहे.

काही जणांनी ही मोहिम म्हणजे एक थट्टा असल्याचे मत व्यक्त केले आहे मात्र ज्या प्रमाणात लोकांनी या घटनेत रस दाखवला आहे त्यामुळे ती थट्टा राहत नाही. म्हणूनच या घटनेवर अमेरिकी वायुसेनेनेही भाष्य केले आहे. “‘एरिया 51’ हे अमेरिकी वायुसेनेच प्रशिक्षण केंद्र आहे. येथे परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश नाही. त्यामुळे आमच्या सैन्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक कृतीचा आम्ही विरोध करतो. अमेरिकी वायुसेना अमेरिका आणि तिच्या संपत्तीच्या संरक्षणासाठी नेहमीच तयार आहे,” असे वायुसेनेच्या प्रवक्त्या लॉरा मॅकअँड्रयूज यांनी सांगितले.

त्यामु ळेसोशल मीडियावर सुरू असलेली ‘स्टॉर्म एरिया 51’ ही मोहीम केवळ थट्टा ठरते अथवा ती वास्तवात उतरते हे पाहण्यासाठी 20 सप्टेंबरची वाट पाहावी लागेल.

Leave a Comment