नियमित झोपा, उत्तम जगा!


लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे अशी म्हण आपल्याकडे आहे. शतकानुशतके जी गोष्ट आपल्याकडे माहीत होती त्यावर पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केले आहे. ज्या लोकांची झोपण्याची व उठण्याची वेळ सारखी बदलत असते आणि झोपेचा कालावधी सारखा बदलत असतो, त्यांच्या चयापचयावर परिणाम होतो. म्हणजेच त्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात, असे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. एका नवीन संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या चयापचयातील गडबडीमुळे उद्भवणाऱ्या अनेक आजारांचा संबंध झोपेच्या अभावाशी अनेक वर्षांपासून जोडला जात आहे. मात्र या ताज्या संशोधनापर्यंत झोपेतील अनियमिततेमुळे, खासकरून रात्रीच्या वेळेस झोपेचा कालावधी आणि प्रमाण यातील बदलांमुळे आरोग्यावर किती परिणाम होतो याची संशोधकांना जास्त माहिती नव्हती. डायबिटीज केअर नावाच्या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

तिआन्यी हुआंग हे या संशोधकांपैकी एक आहेत. बोस्टनमधील ब्रिगेम अँड विमेन्स हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये हुआंग हे कार्यरत आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेला पाठविलेल्या ईमेलमध्ये हुआंग यांनी म्हटले आहे, “एखाद्याने थोडा वेळ झोप घेतली किंवा जास्त वेळ झोप घेतली किंवा त्याला चांगली झोप लागली की नाही याच्यापेक्षा झोपेच्या अनियमित वेळांमुळे चयापचयाशी संबंधित आजारांचा जास्त धोका असतो.”

प्रत्येक रात्री झोपेमध्ये अंतर पडण्यामुळे चयापचयाचे एकाच वेळी अनेक आजार होण्याचा धोका जास्त असतो. ही अनियमितता झोपेच्या कालावधीची किंवा वेळेचीही असू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. काही रात्री दीर्घकाळ झोपल्यामुळे हे प्रभाव टाळता येत नाहीत, असे हुआंग यांनी सांगितले.

या संशोधनासाठी 2,003 रुग्णांनी एक आठवडाभर आपापल्या घरी झोपेचा अभ्यास केला.यासाठी अॅक्टिग्राफ नावाच्या एका उपकरणाचा वापर केला. हे उपकऱण रात्री होणाऱ्या शरीरांतर्गत हालचाली आणि झोप व जागरणाच्या चक्राचे मोजमाप करते. या लोकांना दर रात्री सरासरी सुमारे 7.15 तास झोप मिळाली आणि ते रात्री 11:40 वाजता झोपी गेले. त्यांच्यापैकी जवळजवळ दोन-तृतियांश लोकांचा झोपण्याचा कालावधी एका तासापेक्षा जास्त बदलत होता. आणि त्यांच्यापैकी 45 टक्के जणांची झोपायची वेळ एक तासापेक्षा जास्त मागेपुढे होत होती. यातील एकूण 707 रुग्णांना किंवा 35 टक्के जणांना चयापचयाचे विकार होते. हे विकार अनेक प्रकारचे होते आणि त्यांमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. यात वाढीव रक्तदाब, रक्तातील साखरेचे जास्त प्रमाण, पोटावरील अधिक चरबी आणि शरीरातील काही रसायनांची असामान्य पातळी यांचा समावेश होता.

झोपण्याच्या कालावधीत एका तासापेक्षा कमी बदल असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत ज्या लोकांची झोपण्याची वेळ 60 ते 9 0 मिनिटांनी बदलली त्यांच्यात चयापचयाचे विकार 27 टक्के जास्त असल्याचे संशोधकांना आढळले. झोपण्याचा कालावधी 90 ते 120 मिनिटे बदललेल्या लोकांमध्ये हेच प्रमाण 41 टक्क्यांपर्यंत वाढले होते. झोपण्याच्या कालावधीत दोन तासांपेक्षा जास्त बदल असलेल्या लोकांमध्ये हेच प्रमाण तब्बल 51 टक्के आढळले आणि झोपेच्या कालावधीत दोन तासांपेक्षा जास्त बदल झाल्यास हे प्रमाण 57 टक्के आढळले. असाच फरक झोपण्याच्या वेळेत बदल असलेल्या लोकांमध्येही दिसला आहे.

विशेष म्हणजे हे संशोधन झोपण्याच्या वेळेमध्ये किंवा कालावधीतील बदलांचा चयापचय विकारांवर काय किंवा कसा परिणाम होतो, हे सिद्ध करण्यासाठी हाती घेण्यात आले नव्हते. उलट अनियमित झोपेची सवय आणि चयापचयाच्या रोगांमधील संबंध त्यातून पुढे आला.

क्रिस्टन क्नुट्सन या नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये कार्यरत असलेल्या संशोधक आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनियमित झोपेमुळे आपल्या चयापचय प्रणाली आणि आरोग्यावर परिणाम होण्याचे एक कारण आपल्या शरीराचे जैविक घड्याळ हे आहे. क्नुट्सन या संशोधनात सहभागी नव्हत्या. मात्र त्यांनी एका ईमेलमध्ये म्हटले आहे, की मानवी शरीरामध्ये 24-तासांची एक लय असते आणि चांगल्या आरोग्यासाठी ही लय व्यवस्थित कार्य करत राहिली पाहिजे. एखादी व्यक्ती वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या प्रमाणात झोपत असली तरी शारीरिक घड्याळाला जुळवून घेणे कठीण जाते आणि त्यामुळे नुकसान होऊ शकते.

या संशोधनाची एक मर्यादा म्हणजे संशोधकांनी केवळ एका आठवड्यासाठी झोपेचा अभ्यास केला. तसेच झोपेच्या अनियमितपणावर परिणाम करणाऱ्या ब्रेकफास्ट व जेवणाच्या वेळेसारख्या गोष्टींबद्दलही संशोधकांना कमी माहिती आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश प्रौढांना दर रात्री किमान सात तास झोपेची गरज असते. योग्य प्रमाणात आणि चांगली झोप येण्यासाठी तज्ञांनी काही सल्ले दिलेले आहेत. त्यामध्ये झोपण्याची एक निश्चित वेळ ठरविणे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे नसलेल्या अंधाऱ्या खोलीत झोपणे आणि झोपण्यापूर्वी जड भोजन, कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे यांचा समावेश आहे.

Leave a Comment