चार वर्षे वयाच्या मुलाचा, आपण प्रिन्सेस डायनाचा अवतार असल्याचा दावा !


ऑस्ट्रेलियन टीव्ही प्रेझेंटर डेव्हिड कॅम्पबेल यांच्या चार वर्षीय मुलाने, बिलीने गेल्या काही काळामध्ये सर्वांनाच थक्क करून सोडले आहे. वास्तविक बिलीला ब्रिटनच्या शाही खानदानाच्या विषयी काही माहिती नाही, तरीही वयाच्या दुसऱ्या वर्षीपासूनच आपल्या रूपामध्ये दिवंगत प्रिन्सेस डायनाचा पुनर्जन्म झाल्याचे बिली निक्षून सांगत आहे. इतकेच नव्हे, तर प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या पुत्रांचा, म्हणजेच विलियम आणि हॅरीचा उल्लेख, बिली, ‘माझी मुले’ म्हणून करत असतो. बिलीने स्कॉटलंड येथील राणी एलिझाबेथ यांचे शाही निवासस्थान असलेले बाल्मोरल कासल एकदाही प्रत्यक्षात पाहिलेले नाही, पण तरीही या भव्य राजवाड्याचे आणि त्याच्या अवतीभवतीच्या परिसराचे वर्णन बिली अचूक करू शकतो.

या सर्व घटनांना सुरुवात, बिली अवघा दोन वर्षांचा असताना झाली. प्रिन्सेस डायनाचे छायाचित्र पाहताच, ‘हे पाहा माझे छायाचित्र, तेव्हा मी राजकुमारी होते’ असे बिलीच्या तोंडून बाहेर पडलेले उद्गार ऐकून सर्वच जण थक्क झाले. त्यानंतर बिलीने प्रिन्सेस डायनाशी निगडीत अश्या काही हकीकती सांगितल्या, ज्या त्याला इतक्या लहान वयामध्ये माहिती असण्याची कोणतीच शक्यता किंवा कारण नव्हते. बिलीने सर्वांना डायनाचा भाऊ जॉन याच्याबद्दल सांगितले. पण वास्तविक डायनाच्या या भावाबद्दल फारशी माहिती सापडत नाही, कारण डायनाचा जन्म होण्याआधीच जॉनचा मृत्यू झालेला होता. आपण स्कॉटलंड येथे जाताना नेहमी ‘किल्ट’ परिधान करीत असल्याचेही बिलीने सांगितले.

बिलीने डायनाशी निगडित हकीकती कथन करताना तिच्या अपघाती निधनाबद्दलही अनेक धक्कादायक विधाने केली आहेत. किंबहुना अपघात झाल्यानंतर पोलिसांच्या गाड्यांचे आणि रुग्णवाहिकेचे सतत वाजत राहणारे सायरन आपल्याला अद्यापही स्पष्ट ऐकू येत असल्याचे बिलीचे म्हणणे आहे. त्याचबरोबर बिलीने डायनाबद्दल अनेक लहान मोठ्या हकीकती कथन केल्या आहेत. हा दैवी चमत्कार म्हणावा, की खरोखरच प्रिन्सेस डायनाचा बिलीच्या रूपात पुनर्जन्म झाला आहे, हे आता बिलीच्या मातापित्यांना कळेनासे झाले आहे. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बिली संपूर्णपणे तंदुरुस्त असून त्याच्यामध्ये असलेली ही आगळी वेगळी शक्ती निसर्गाचा चमत्कार म्हणावी लागेल.

Leave a Comment