आयआयटी खडगपूरमधील विद्यार्थ्यांनी तयार केले जखमांवर गुणकारी ‘हायड्रोजेल’


दिवसभराच्या धावपळीमध्ये, खेळताना, गाडी चालविताना, भाजी चिरताना, काही कापताना आणि इतरही कामे उरकत असताना हाता-पायांवर आलेले लहान सहान ओरखडे, चिरा, कापल्यावर होणाऱ्या जखमा भरून काढण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक रित्याच आलेली असते. या लहान जखमांमध्ये जंतूंचे संक्रमण होऊ नये यासाठी जीवाणू प्रतिरोधी मलमे लावली जातात. मात्र अलीकडच्या काळामध्ये ‘अँटीबायोटिक रेझिस्टन्ट’ जीवाणूंची संख्या वाढत चालली असल्याने केवळ जीवाणू प्रतिरोधी मलमे, जंतूंचे संक्रमण रोखू शकतीलच याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे सुरुवातीला लहानशी भासणारी जखम चिघळून, किंवा संक्रमण होऊन कधी गंभीर स्वरूप धारण करेल याचा नेम नसतो. हाच प्रश्न विचारात घेत आयआयटी खडगपुरमधील तीन विद्यार्थ्यांनी अतिशय कमी किंमतीमध्ये दह्याचा वापर करून एक जेल तयार केले आहे. या जेलच्या वापराने ‘अँटीबायोटिक रेझिस्टन्ट’ जंतूंमुळे होणारे संक्रमण थांबविता येऊ शकते. इतकेच नाही, तर या जेलच्या वापराने जखम लवकर भरून येण्यासही मदत होते.

दह्याचा वापर केवळ आहारामधेच नाही, तर औषधी म्हणून फार प्राचीन काळापासून केला जात आहे. दही घट्ट होण्यासाठी ते मलमलच्या कपड्यामध्ये बांधून ठेऊन त्यातील पाणी गाळून काढले जाते. हे पाणी सहसा टाकूनच दिले जाते. मात्र या पाण्यामध्ये ‘बायो-अॅक्टिव्ह पेप्टाइड्स’ मोठ्या प्रमाणावर असून याचा उपयोग उपचारपद्धतीमध्ये करता येतो. हेच पाणी शुद्ध करून त्यामध्ये इतर रसायने मिसळून हे ‘हायड्रोजेल’ तयार करण्यात आले आहे. या हायड्रोजेलचा वापर प्रायोगिक पातळीवर केला गेला असता, त्यामुळे काही ‘अँटीबायोटिक रेझिस्टन्ट’ जंतूंचा नाश होत असल्याचे निदान झाले असून, इतर जंतूंचा नाश करण्यासाठी हायड्रोजेलचा अतिरिक्त डोस वापरावा लागणार असल्याचे निदान करण्यात आले आहे.

या हायड्रोजेलची किंमत अतिशय कमी असून, हे तयार करण्यासाठी कोणत्याही अपायकारक रसायनाचा वापर केला गेलेला नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या लहान जखमांवर हे हायड्रोजेल विनाकाळजी लावले जाऊ शकते. या हायड्रोजेलच्या चाचण्या पूर्णपणे यशस्वी झाल्यानंतर मगच हे हायड्रोजेल बाजारामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment