काश्मिरी गद्दारांना गिलगिट-बाल्टिस्तानवासियांची चपराक!


गेली सात दशके भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या काश्मिरातील बहुसंख्य जनता भारताच्या बाजूने आहे. मात्र काही मूठभर उपद्रवी लोकांमुळे या भागात अशांतता असल्याचे चित्र निर्माण होते. विशेषतः भारताला खिजवून पाकिस्तानचे गुणगान गाण्यात या मंडळींना धन्य वाटते. त्यातून त्यांना फायदा होतो मात्र सर्वसामान्य लोकांना यातना सहन कराव्या लागतात.

गेल्या आठवड्यात सय्यद शाह गिलानी या फुटीरवादी नेत्याने अशाच प्रकारे भारताला खिजविण्याचा प्रकार केला. आम्ही पाकिस्तानी आहोत, अशा प्रकारच्या घोषणा या गिलानीने दिल्या. ‘हम पाकिस्तानी हैं और पाकिस्तान हमारा है’ अशा घोषणा देतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अशा गद्दारांमुळे काश्मिरवर दावा सांगण्यासाठी पाकिस्तानच्या अंगात बळ येते. मात्र या मंडळींना एक सणसणीत चपराक मारली आहे ती पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतातील नागरिकांनी!

पाकिस्तानने आमच्यावर बळजबरी ताबा मिळवला असून पाकिस्तान केवळ आमचा सांभाळ करत आहे. वस्तुतः गिलगिट- बाल्टिस्तान हा भाग जम्मू-काश्मिर प्रांताचाच भाग आहे, असे गिलगिट- बाल्टिस्तानच्या लोकांनी खुले पत्र लिहून स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्मिरमधील तथाकथित स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या म्हणजे फुटीरवादी नेत्यांच्या नावानेच हे पत्र लिहिले आहे. जम्मू-काश्मिर नॅशनल अवामी पार्टी (जेकेएनएपी), जम्मू-काश्मिर पीपल्स नॅशनल पार्टी (जेकेपीएनपी), जम्मू-काश्मिर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ), जम्मू-काश्मिर राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (जेकेएनएसएफ), काश्मिर नॅशनल पार्टी (केएनपी), युनायटेड काश्मिर पीपल्स नॅशनल पार्टी (यूकेपीएनपी), जम्मू काश्मिर नॅशनल इंडिपेंडन्स अलायन्स (जेकेएनआयए) अशा पक्षांचे नाव घेऊन यात कानपिचक्या देण्यात आल्या आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव आणि 28 एप्रिल 1949 रोजी झालेल्या कराची करारानुसार गिलगिट-बाल्टिस्तान हा जम्मू-काश्मिरचा भाग आहे. त्यामुळे पाकिस्तानची भूमिका केवळ देखभाल करणाऱ्याची आहे, त्याला सीमा बदलण्याचा काही एक अधिकार नाही, असे या लोकांनी म्हटले आहे. संपूर्ण जम्मू-काश्मिरची स्थिती वादग्रस्त असून नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजून असलेल्या जम्मू-काश्मिरला हे विधान लागू होते, याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

गिलगिट हे काश्मिरच्या उत्तरी भागातील सर्वात मोठे शहर असून ते बाल्टिस्तान प्रांताची राजधानी आहे. गिलगिट नदी येथूनच वाहते. गिलगिटच्या पूर्वेला कारगिल, उत्तरेला चीन, वायव्येला अफगाणिस्तान, पश्चिमेला खैबर पख्तूनख्वा आणि आग्नेय दिशेला बाल्टिस्तान आहे. हिमालय, काराकोरम आणि हिंदूकुश या जगातील तीन प्रमुख पर्वतमालांचा संगम येथून जवळच आहे. यावरून त्याचे सामरिक महत्त्व लक्षात येऊ शकेल. पाकिस्तानच्या राज्यघटनेत या प्रांताचा काहीही उल्लेख नाही. पाकव्याप्त काश्मिरचा भाग म्हणूनही त्याचा उल्लेख नाही. इतकेच कशाला, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये हा भाग तथाकथित आझाद काश्मिरचा नव्हे तर जम्मू- काश्मिरचा भाग असल्याचे स्पष्ट केले होते. गेल्या वर्षी पाकिस्तानने या भागाला अधिकृतपणे आपला पाचवा प्रांत म्हणून जाहीर केले होते. तेव्हा भारताने त्याला जोरदार आक्षेप घेतला होता.

भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानी सैन्याने टोळीवाल्यांच्या रूपात काश्मिरवर आक्रमण केले. त्यानंतर महाराजा हरिसिंहांनी काश्मिरचे विलीनीकरण भारतात केले. त्यावेळी जम्मू-काश्मिरची तीन भागांमध्ये वाटणी करण्यात आली. युद्धानंतर झालेल्या संधीत तिसरा व उत्तरी भागातील गिलगिट लडाखची वाटणी दोन भागांमध्ये करण्यात आली. हा 28,000 चौरस मैलांचा प्रदेश श्रीनगर आणि मुझफ्फराबादपासून वेगळा होता. यातीलच 2,000 चौरस मैलांचा प्रदेश पाकिस्तानने 1963 मध्ये चीनला दिला होता. त्याच प्रमाणे आता गिलगिट-बाल्टिस्तान हा भाग पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांताला जोडून तेथील प्रत्यक्ष स्थिती बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून जम्मू-काश्मिरची सीमाच संपवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे.

मुळात गिलगिट-बाल्टिस्तानवर पाकिस्तानचा ताबाच अवैध असल्यामुळे त्याने तेथील जनभावनेची कधीही कदर केलेली नाही. तेथील नैसर्गिक संसाधनांचे प्रचंड शोषण करण्यात आले आणि तेथील लोकांना स्वतःच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्याची वेळ आली. आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे आणि मानवाधिकारांचे स्तोम माजल्यामुळे काश्मिरमधील फुटीरवाद्यांना मोकळे रान मिळाले आहे. मात्र भारतीय कब्ज्यातून बाहेर पडलेल्या बाल्टिस्तानसारख्या प्रांताला वास्तवाची जाणीव आहे. ज्याचे जळते त्यालाच कळते म्हणतात तशी त्यांची स्थिती आहे. त्यामुळेच आपल्या सीमापार भाईबंदांना त्यांनी परिस्थितीच्या चटक्याची जाणीव करून दिली आहे, ही आपल्यासाठी सुखद गोष्ट म्हणायला पाहिजे.

Leave a Comment