कोहलीला विश्वविजेता बनण्यापासून रोखण्यासाठी धोनीने मुद्दामुन सामना गमावला


नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर सध्या कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी टीकाकारांचे लक्ष्य बनत आहेत. त्यात धोनीवर संथ खेळामुळे अधिक टीका होत आहे. त्यातच आता त्याच्या निवृत्तीच्या चर्चाही जोर धरत आहेत आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडूनही (बीसीसीआय) तसे संकेत मिळत आहेत. उपांत्य फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंडकडून 18 धावांनी हार मानावी लागली होती. रवींद्र जडेजा आणि धोनी यांनी या सामन्यात सातव्या विकेटसाठी 116 धावांची विक्रमी भागीदारी करून शर्थीचे प्रयत्नही केले, पण टीम इंडियाच्या पदरी अपयश आले. त्यातच आता धोनीनं हा सामना ठरवून गमावल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

धोनीवर भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंह याचे वडील योगराज हे सातत्याने टीका करत आहेत. धोनीचा युवराजची कारकीर्द संपवण्यात हात असल्याचे आरोपही योगराज यांनी अनेकदा केला आहे. आता तर वर्ल्ड कप स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना धोनी ठरवून हरल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. किवींच्या मार्टिन गुप्तीलने अप्रतीम थ्रो करून धोनीला धावबाद केले आणि तेथेच भारताचा पराभव निश्चित झाला.

एका इंग्रजी वेबसाईटला योगराज यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, धोनी न्यूझीलंडने ठेवलेले माफक लक्ष्य पार करू शकला असता, पण त्याची तशी इच्छाच नव्हती. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणी भारतीय कर्णधाराने वर्ल्ड कप उचंवावा, हे त्याला नको होते. रवींद्र जडेजा खोऱ्याने धावा करत होता, भारत हे लक्ष्य पार करेल असे त्यावेळी स्पष्ट चित्र होते. पण, त्यावेळी धोनीने उपयुक्त खेळी केली नाही.

योगराज यांनी अंबाती रायुडूच्या तडकाफडकी निवृत्तीपासून ते भारताचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपेपर्यंत सातत्याने धोनीलाच लक्ष्य केले. ते म्हणाले, कोणत्याही तणावाशिवाय रवींद्र जडेजा फटकेबाजी करत होता. धोनी त्यावेळी दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत होता. तो 77 धावांवर खेळत असताना धोनी त्याला मोठे फटके मारण्यास सांगत होता. त्यापूर्वी हार्दिक पांड्याला फिरकीपटूंवर फटकेबाजी करण्यास त्याने सांगितले.

इतकी वर्ष धोनी तू क्रिकेट खेळत आहेस. अशा परिस्थितीत काय करावे, काय करू नये याची जाण तुला नाही? कोणत्याही खेळाडूला कधी युवराजने अशी फटकेबाजी करण्याचा सल्ला दिला का? तू अनेकदा उत्तुंग षटकार खेचले आहेस मग त्याच सामन्यात काय झाले? तुला कोणती चिंता सतावत होती? तुला बाद होशील असे वाटत होते का? तू संघ जिंकावा म्हणून काय केलेस?, असे अनेक प्रश्न योगराज यांनी केले.

Leave a Comment