तब्बल ३२ वर्षांनंतर तुमच्या भेटीला आले ‘अश्विनी ये ना…’चे रिक्रेएटेड व्हर्जन


१९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘गंमत जंमत’ या चित्रपटातील ‘अश्विनी ये ना’ हे गाणे त्याकाळी चांगलेच गाजले होते. आता हे गाणे तब्बल ३२ वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणे प्रेक्षकांना आगामी ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटातून एका नव्या रुपात पाहता येणार आहे. ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटाचे म्युझिक लॉन्च नुकतेच करण्यात आले. अशोक सराफ, चारुशीला साबळे, सचिन पिळगांवकर यांनीही ‘अश्विनी ये ना…’ या गाण्याच्या म्युझिक लॉन्चवेळी हजेरी लावली होती.

‘अश्विनी ये ना…’ हे गाणे गायक अवधूत गुप्ते आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी गायले आहे. तर चित्रपटात या गाण्याशिवाय आणखी दोन गाणी असून शाल्मली खोलगडे, मिक्का सिंग यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा २’, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओने चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद लेखन हृषिकेश कोळी आणि हेमंत ढोमे यांनी केले आहे.

अनिकेत विश्वासराव, संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी तगडी स्टारकास्ट ‘ये रे ये रे पैसा २’मध्ये भूमिका साकारणार आहे. येत्या ९ ऑगस्टला ‘ये रे ये रे पैसा २’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.