विमान उशीराने निघाल्यास प्रवाश्यांसाठी मोफत भोजनासह अनेक नवे नियम लागू


पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हवामान खराब झाल्याने किंवा कधी काही तांत्रिक अडचणी उद्भवल्याने अनेकदा विमान नियोजित वेळेपेक्षा उशीराने निघणार असल्याची सूचना मिळते. अश्या वेळी त्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना अनेक तास विमानतळावरच ताटकळत बसावे लागते, तर कधी विमानाचे तिकीट आरक्षित केल्यानंतर नाही कारणाने प्रवास रहित झाल्यास विमानाचे तिकीट रद्द करताना ग्राहकांना कॅन्सलेशन चार्जेसच्या नावाखाली भरघोस रक्कम द्यावी लागत असते. ग्राहकांच्या या आणि अश्या इतरही अनके अडचणींवर तोडगा काढणारे नवे नियम नागरी उड्डाण मंत्रालयाच्या द्वारे काही काळापूर्वी नव्यानेच लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमांची माहिती करून घेऊ या.

ग्राहक प्रवास करणार असलेले विमान दोन ते सहा तास उशीराने निघणार असल्यास, एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, संबंधित एअरलाईनने त्या विमानाने प्रवास करणार असलेल्या, आणि विमानतळावर उपस्थित असणाऱ्या सर्व प्रवाश्यांना मोफत चहापान किंवा भोजन देण्याची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. अश्या वेळी ग्राहकांसाठी इतर विमानाच्या द्वारे प्रवासाची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारीही संबंधित एअरलाईन्सची असणार आहे. जर विमानाला निघण्यासाठी सहा तासांच्या पेक्षा जास्त उशीर होणार असेल, तर तिकीट रद्द करून ग्राहकाचे सर्व पैसे परत करणे विमान कंपनीसाठी बंधनकारक असणार आहे. तसेच रात्री आठ ते पहाटे तीन या काळामध्ये निघणारे विमान नियोजित वेळेपेक्षा उशीराने उड्डाण करणार असल्यास ग्राहकांसाठी हॉटेल्समध्ये मुक्कामाची व्यवस्था एअरलाईनने करणे बंधनकारक आहे.

ग्राहक ज्या विमाने प्रवास करणार असतील ते विमान रद्द झाल्यास आणि तशी पूर्वसूचना ग्राहकाला एअरलाईनच्या वतीने देण्यात आली नसल्यास, किंवा विमानाला पोहोचण्यास उशीर झाल्याने ग्राहकाची पुढची ‘कनेक्टिंग’ फ्लाईट चुकल्यास विमानकंपनीने त्यांची नुकसानभरपाई ग्राहकांना द्यायची आहे. यायामध्ये ‘बेसिक’ प्रवासभाडे + फ्युएल चार्जेस, किंवा विमानप्रवासासाठी लागणारा वेळ एका तासाचा असल्यास पाच हजार रुपये, प्रवासासाठी लागणारा वेळ दोन तासांचा असल्यास दहा हजार रुपये, यांमध्ये जी रक्कम कमी असेल ती रक्कम नुकसान भरपाई म्हणून ग्राहकांना द्यायची आहे. विमान रद्द झाल्यास ग्राहकांना तिकिटाच्या रक्कमेचा ‘रिफंड’ देणे किंवा त्यांच्या प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करणे विमान कंपनीसाठी बंधकारक असणार आहे.

विमान प्रवास काही कारणाने रहित झाल्यास तिकीट रद्द करताना ग्राहकांना कॅन्सलेशन चार्जेस द्यावे लागत असत. मात्र आतापासून ज्या दिवशी तिकीट आरक्षित केले आहे, त्या दिवसापासून चोवीस तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास ग्राहकांना कॅन्सलेशन चार्जेस देण्याची आवश्यकता असणार नाही. मात्र हा नियम केवळ अश्या ग्राहकांना लागू आहे ज्यांनी प्रवासाच्या तारखेच्या किमान एक आठवडा आधी तिकिटे आरक्षित केलेली असतील. प्रवासाच्या तारखेसाठी सात दिवसाहून कमी अवधी शिल्लक असता तिकीट आरक्षित करून रद्द केल्यास बेस फेअर आणि फ्युएल चार्ज लक्षात घेता ठराविक किंमत कॅन्सलेशन चार्ज म्हणून आकारण्याचा हक्क एअरलाईनला असणार आहे. तसेच तिकिटाचे आरक्षण चुकीच्या नावाने झाल्यास, नावामध्ये योग्य तो बदल तिकीट आरक्षित केल्याच्या चोवीस तासांच्या आत केल्यास त्यासाठी कोणतेही दर आकारण्यात येणार नाहीत. विमानप्रवासाच्या दरम्यान प्रवाश्यांचे सामान हरविल्यास किंवा सामानाची मोडतोड झाल्यास प्रती किलोमागे साडेतीनशे रुपये या प्रमाणे नुकसान भरपाई देणे एअरलाईनसाठी बंधनकारक असणार आहे. तसेच प्रवासाच्या दरम्यान विमानामध्ये अपघाताने एखाद्या प्रवाश्याला शारीरिक इजा झाल्यास त्याचीही नुकसानभरपाई एअरलाईनला द्यावी लागणार आहे.

Leave a Comment