माजी ब्रिटिश खलाशी घेणार इतिहासाची ‘विराट’ अडगळ!


भारतीय नौदलाची शान असलेल्या आयएनएस विराट या युद्धनौकेला अखेर मोडीत काढण्याचे सरकारने नक्की केले आहे. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी संसदेत या संबंधात स्पष्ट उत्तर दिले. त्यामुळे इतिहासाची साक्षीदार असलेली ही नौका आता केवळ आठवणींपुरती राहणार हे नक्की झाले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचीही इतिश्री झाली आहे. त्याच वेळेस या नौकेवर काम केलेल्या एका माजी ब्रिटिश खलाशाने मात्र ही नौका वाचवण्याचा चंग बांधला आहे.

आयएनएस विराट या युद्धनौकेला देशाच्या लष्करी इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. आयएनएस विराटने भारताला पाच नौदलप्रमुख, 19 व्हाईस अॅडमिरल, 22 रिअर अॅडमिरल असे 46 ध्वजाधिकारी दिले आहेत. ही विमानवाहू युद्धनौका 1987 मध्ये भारतीय नौदलात सामील झाली. तब्बल 30 वर्षे सेवा बजावल्यानंतर 2017 मध्ये ‘आयएनएस विराट’ला नौदलातून निरोप देण्यात आला होता. विराटला नौदलाने 6 मार्च 2017 पासून आपल्या ताफ्यातून कमी केले. त्यानंतर नौदलाने निवृत्त केलेल्या ‘विराट’वर पंचतारांकित हॉटेलसह पर्यटन केंद्र आणि संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव होता. सध्या ही युद्धनौका नौसेना गोदीमध्ये (नेव्हल डॉकयार्ड) ठेवण्यात आली आहे.

आता या निविदेला पूर्णविराम लावण्यात आला असून ‘विराट’ ला मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे. “आयएनएस विराट’ला मोडीत काढण्याचा निर्णय झाला आहे. या जहाजाला कोणत्याही सरकारच्या हवाली केले जाणार नाही. सर्व बाजूंनी विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे नाईक यांनी सांगितले.

‘आयएनएस विराट’वर सरकारी आणि खासगी भागीदारीत पर्यटन केंद्र आणि संग्रहालय उभारण्याच्या निर्णयाला महाराष्ट्राचया मंत्रिमंडळाने नोव्हेंबर 2018 मध्ये मंजुरी दिली होती. या प्रस्तावाची किंमत 852 कोटींची होती. भारतीय नौसेनेचा समृद्ध इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा, तसेच शालेय-महाविद्यालयीन तरुणांमध्ये सागरी क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी तिचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर करावे, असा प्रस्ताव शासनाला देण्यात आला होता. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर राबविण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दाखवली होती.

महाराष्ट्र सरकारने केंद्रीय संरक्षण मंत्रालयास सादर केलेल्या प्राथमिक प्रस्तावानुसार ही नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्स येथे किनाऱ्यापासून सात सागरी मैल अंतरावरील समुद्रात काँक्रीट पायाभरणी करून स्थापित करण्यात येणार होती. या ठिकाणी असणारे वैविध्यपूर्ण सागरी जैवविश्व पर्यटकांना त्यानिमित्त पाहता येतील, असे सरकारचे मत होते. सागरी प्रशिक्षणासाठीही या जहाजावर सुविधा उपलब्ध करण्याचे विचाराधीन होते. इतकेच नव्हे तर व्यापारी जहाजावर काम करणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचीही सोय करण्यात येणार होती. या नौकेवरील वस्तुसंग्रहालयात सागरी क्षेत्राशी संबंधित वस्तू, दृकश्राव्य कार्यक्रम, सागरी क्षेत्राचा इतिहास प्रदर्शित करणारे आभासी दालन इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार होत्या. मात्र संरक्षण मंत्रालयाला ते मान्य नाही.

महाराष्ट्रासह अन्य राज्यांनीही विराटचे रूपांतर स्मारकात करण्याची तयारी दाखवली होती. ‘आयएनएस विराट’ या युद्धनौकेचे हवाई संग्रहालय आणि पर्यटन स्थळ बनवण्यासाठी ती आपल्या ताब्यात द्यावी, अशी मागणी आंध्र प्रदेश सरकारने संरक्षण मंत्रालयाकडे केली होती. तसा प्रस्ताव आंध्र प्रदेश सरकारने 26 ऑक्टोबर 2016 मध्ये पाठवला होता. विराटच्या खर्चाची 50 टक्के रक्कम आपण देऊ, असे आंध्र प्रदेशाने प्रस्तावात म्हटले होता. मात्र संरक्षण खात्याने हा प्रस्ताव मान्य केला. तसे दि. 14.12.2016 रोजी या खात्याने आंध्र प्रदेशाला कळवले होते.

आयएनएस विराट ही भारतीय नौदलाने ब्रिटिश नौदलाकडून विकत घेतलेली नौका. त्यावेळी तिचे नाव एचएमएस हर्मिस असे होते. ब्रिटनच्या सेवेत असताना एचएमएस हर्मिसने फॉकलंड युद्धात कामगिरी बजावली होती. विराटच्या निवृत्तीच्या वेळेस एचएमएस हर्मिसवर सेवा बजावलेले अनेक नौदल अधिकारी उपस्थित होते. त्यापैकी अँडी ट्रीश हा खलाशी त्यावेळी केवळ 17 वर्षांचा होते. आज हेच अँडी ट्रीश आज एक माहिती तंत्रज्ञान कंपनी चालवतात आणि आता ते ही नौका वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. फॉकलंड युद्धाच्या वेळेस अँडी यांनी या 103 दिवस काढले होते आणि त्यांचा 19 वा वाढदिवस याच नौकेवर साजरा करण्यात आला होता.

अँडी यांचे या नौकेशी ऋणानुबंध असल्यामुळे ती भंगारात जाऊ नये, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी 2 कोटी 50 लाख डॉलरची बोली लावण्याचे ठरविले आहे. ही नौका परत इंग्लंडला नेऊन लंडन किंवा लिव्हरपूल येथे तिचे रूपांतर एका हॉटेलमध्ये करण्याची त्यांची योजना आहे. ही केवळ त्यांची वैयक्तिक बोली असणार असून त्यात सरकारचा सहभाग नसेल, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय नौदलाची आणखी एक गौरवशाली नौका आयएनएस विक्रांत ही 2012 मध्ये अशाच प्रकारे भंगारात काढण्यात आली होती. अँडी ट्रीश यांच्यासारख्या भावनिक खलाशांमुळे किमान विराट तरी वाचते का, हे पाहणे रंजक ठरेल.

Leave a Comment