इंग्लंडच्या विजयावर शाहिद कपूरला देखील आक्षेप


लंडन : विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या थरारक सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना दोनवेळा टाय झाल्यामुळे चौकारांच्या संख्येवरुन इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ करुनही, न्यूझीलंड कमनशीबी ठरला. निर्धारित 50 षटकात 8 बाद 241 धावा या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने केल्या होत्या. इंग्लंडनेही त्याचा पाठलाग करताना 50 षटकात सर्वबाद 241 धावा केल्याने सामना टाय झाला.

सामना टाय झाल्यामुळे विश्वचषकाचा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या. मग न्यूझीलंडनेही 15 धावाच केल्याने, आयसीसीच्या नियमानुसार संपूर्ण सामन्यामध्ये सर्वाधिक चौकार मारणारा संघ विजयी ठरला. त्यानुसार इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाल्यास सर्वाधिक चौकार मारणारा संघ विजयी हा आयसीसीचा नियम आहे. पण विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर याच नियमावर टीका होत आहे. फुटबॉलमध्ये ज्याप्रमाणे पेनल्टी शूटआऊटनंतर सडनडेथद्वारे निकाल लावला जातो, त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये तसा नियम का नाही असा सवाल विचारला जात आहे. आयसीसीच्या या नियमावर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरपासून, भारताने जिंकलेल्या विश्वचषकाच्या फायनलचा हिरो गौतम गंभीरपर्यंत अनेकांनी बोट ठेवले आहे.


यासंर्दभात टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ म्हणतो, सर्वाधिक चौकारांचा नियम पचविण्यास कठीण जात आहे. कोणतातरी सडनडेथसारखा नियम हवा, ज्यामुळे निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात याव्या. एक संघ विजेता घोषित करण्याबाबत समजू शकतो, पण सर्वाधिक चौकारांच्या नियमाऐवजी दोघांना विभागून विजेतेपद देणे जास्त योग्य ठरले असते.


विश्वचषकाच्या फायनलबाबत अभिनेता शाहिद कपूरनेही केलेल्या ट्विटला अनेक लाईक्स आणि रिट्विट मिळत आहेत. शाहिद कपूर म्हणतो, विभागूनच या वर्ल्डकपचे विजेतेपद हे द्यायला हवे. जास्त चौकार जर इंग्लंडने मारले असतील, तर जास्त विकेट्स न्यूझीलंडने घेतल्या असल्यामुळे विजयाचा निकष चुकीचा आहे. दोन्ही संघातील 22 खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली, कोणीही कमी पडला नाही. मग केवळ 11 खेळाडूंनाच आपणच बेस्ट असल्याचा मान का मिळावा?


आयसीसीच्या या नियमावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सिक्सर किंग युवराज सिंहनेही खंत व्यक्त केली आहे. त्या नियमाशी मी सहमत नाही, पण नियम हे नियम असतात. अखेर विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या इंग्लंडचे अभिनंदन. शेवटपर्यंत न्यूझीलंडने झुंज दिली, जबरदस्त खेळ आणि जबरदस्त फायनल, असे युवराज सिंह म्हणाला.


हा खेळ कोणत्या परिणामांचा आहे हे समजत नाही. सर्वाधिक चौकारांवरुन क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलचा निकाल देण्यात आला. खूपच हास्यास्पद हा नियम आहे. तो सामना टायच असायला हवा होता. दोन्ही संघांचे अभिनंदन. दोघेही विजेते आहेत, असे गंभीर म्हणाला.

Leave a Comment