नेत्रहीन लोकांना नोटांची ओळख होण्यासाठी आरबीआय घेऊन येत आहे अ‍ॅप


भारतीय रिझर्व्ह बँक नेत्रहीन लोकांना नोटांची ओळख करण्यास मदत व्हावी यासाठी मोबाईल अ‍ॅप आणणार आहे. आजही रोख रक्कमेचे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. सध्या 10, 20, 50,100, 200, 500 आणि 2000 च्या नोटा चलनात आहेत. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, नेत्रहीन लोकांना रोख नोटांचे व्यवहार सोपे होण्यासाठी त्यांना नोटांची ओळख होणे गरजेचे आहे. नोटांची ओळख होण्यास मदत व्हावी यासाठी ‘इंटाग्लियो प्रिटिंग’ आधारित ओळख चिन्ह देण्यात आलेले आहे. हे चिन्ह 100 रुपये आणि त्याच्यावरील नोटांवर आहे.

नोव्हेंबर 2016 मध्ये 500 व 1000 च्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर सध्या आकाराने व डिझाईनमध्ये नवीन असलेल्या नोटा चलनात आहेत. आरबीयने सांगितले की, रिझर्व्ह बँक नेत्रहीन लोकांना दैंनदिन व्यवहार करताना नोटा ओळखण्यात येणाऱ्या अडचणींबाबत संवेदनशील आहे. बँक मोबाईल अ‍ॅप बनविण्यासाठी वेंडरच्या शोधात आहे.

हे अ‍ॅप महात्मा गांधींचा फोटो असलेल्या जुन्या नोटा आणि नवीन नोटा ओळखण्यास मदत करेल. यासाठी नोटेचा फोटो काढावा लागेल. फोटो योग्यरित्या काढला असेल तर अ‍ॅप ऑडिओ नॉटिफिकेशनद्वारे नेत्रहीन व्यक्तीला नोटेच्या किंमतीबद्दल माहिती देईल. जर फोटो व्यवस्थित रित्या काढला गेला नसेल अथवा फोटो ओळखण्यास अडचण येत असेल तर अ‍ॅप  पुन्हा प्रयत्न करण्याच्या सुचना देईल.

आरबीआय अ‍ॅप बनवण्यासाठी कंपन्यांकडून निविदा मागवत आहे. बँकेने याआधी देखील यासाठी प्रस्ताव मागवले होते. मात्र नंतर ते रद्द करण्यात आले. देशात जवळपास 80 लाख नेत्रहीन लोक आहेत. आरबीआयच्या या अ‍ॅपने त्यांना नक्कीच फायदा होईल.

Leave a Comment