जुने ते सोने….इलेक्ट्रॉनिक्समध्येही!


जुने ते सोने ही आपल्याकडची म्हण आहे. ही म्हण आतापर्यंत प्राचीन गोष्टींसाठीच वापरात होती. मात्र आधुनिक मानल्या गेलेल्या परंतु आता अडगळीत गेलेल्या उपकरणांसाठीही आता ही उक्ती लागू पडत आहे. टेपरेकॉर्डर, पेजर, वॉकमन अशा अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांना स्मार्टफोन नावाच्या वस्तूने हद्दपार केले. मात्र जुन्या आठवणींच्या राज्यात रमलेल्या लोकांमध्ये पुन्हा या गोष्टींची क्रेझ निर्माण झाली असून त्यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे.

रेट्रो टेक नावाने हे क्षेत्र आता उदयाला आले आहे आणि त्यातील उलाढाल लक्षावधी डॉलरची झाली आहे. याचे उदाहरण म्हणून जगप्रसिद्ध अॅपल कंपनीचे घेता येईल. मॅकिंटोश हा संगणक बनवणाऱ्या ॲपल कंपनीचे गाणी ऐकण्याचे साधन. आयपॉड क्लासिक, आयपॉड शफल, आयपॉड नॅनो, आयपॉड टच असे याचे विविध प्रकार आहेत. एकेकाळी आयपॉड हे इतके प्रसिद्ध व लोकप्रिय होते की गाणी ऐकता येणाऱ्या कोणत्याही साधनाला आयपॉड म्हटले जात होते. मात्र आधी आयफोन आणि नंतप आयपॅड आले आणि आयपॉड दिसेनासे झाले. परंतु चार वर्षांच्या विश्रांतीनंतर अॅपलने आयपॉडला संजीवनी दिली आणि मे महिन्यात आयपॉड टच नव्याने सादर केले.

इतकेच नाही तर टेपरेकॉर्डरची आधीची आवृत्ती असलेल्या विनील रेकॉर्डची गेल्या चार वर्षांत सरासरी 40 कोटी डॉलर्सची विक्री झाली आहे. बारा ते पंधरा वर्षांपूर्वी सगळीकडे दिसणारे डीव्हीडी प्लेअर कधी बाजूला झाले ते कळलेही नाही. मात्र गेल्या वर्षीपर्यंत दर सुट्ट्यांमध्ये 40 लाख डीव्हीडी प्लेअर विकले जात होते, असे स्टॅटिस्टा या डाटा संग्रह करणाऱ्या संकेतस्थळाने म्हटले आहे.

कॅमकॉर्डर, रेडिओ, घड्याळयुक्त रेडिओ, लँडलाईन फोन आणि डीव्हीआर (डीव्हीडी रायटर) यांचीही विक्रीही चढत्या श्रेणीत आहे. अमेरिकेतील लाखो घरांमध्ये आजही यांचा वापर होतो, असे स्टॅटिस्टाने म्हटले आहे. टम्ब्लर आणि पिंटरेस्ट यांसारख्या सोशल मीडिया संकेतस्थळांवर जुन्या काळातील चित्रांना हजारो लाईक व शेअर मिळतात. खासकरून डिस्पोझेबल कॅमेरे हे पिंटरेस्टवर अनेकदा ट्रेंड करतात.

या उपकरणांचा उपयोग संपूनही अनेक वर्षे लोटली आहेत. तरीही त्यांना एवढी मागणी का, हा प्रश्न तज्ञांना पडला आहे. इंटरनॅशन डाटा कॉर्पोरेशन या कंपनीच्या मोबाईल उपकरण विभागाचे उपाध्यक्ष ऱ्यान रीथ यांच्या मते, “आपल्याला हव्या असलेली उपकरणे हाताशी ठेवू इच्छिणाऱ्या परंतु इतरांशी संबंध न ठेवू पाहणाऱ्या लोकांचा एक वर्ग वाढत आहे. हे लोक बाजारपेठेची पोकळी भरून काढत आहेत.”

ताबडतोब फोटो काढून देणारे पोलोरॉईड कॅमेरे ही एकेकाळी पर्यटकांसाठी नवलाईची गोष्ट होती. सेल्फी संस्कृतीत या कॅमेऱ्यांना काही कामच उरणार नाही, असे मानले जात होते. मात्र किशोरवयीन युवकांमध्ये हे कॅमेरे लोकप्रिय असल्याचे आश्चर्यकारक चित्र आहे. पोलोरॉईडसारखे कॅमेरे बनविणाऱ्या फुजिफिल्मया कंपनीने सीएनएन वाहिनीली दिलेल्या माहितीनुसार, तिच्या कॅमेऱ्यांची विक्री अजिबात घटलेली नाही. मार्च महिन्यात संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने जगभरात 1 कोटींपेक्षा जास्त कॅमेरे आणि स्मार्टफोन प्रिंटर विकले.

जुन्या उपकरणांच्या विक्रीत नोस्टॅल्जिया (स्मरणरंजन) हा एक महत्त्वाचा भाग आहे. या उपकरणांमुळे लोकांना आपल्या लहानपणीचा काळ अनुभवता येतो आणि काही जन्या आठवणीही जागवता येतात. जुन्या उपकरणांमुळे लोकांना वास्तव जगाचा आनंद घेत-घेत तंत्रज्ञानाचा लाभ घेता येतो. स्मार्टफोनमध्ये मात्र नेमके याच्या उलट प्रक्रिया घडते. त्यामुळेच स्मार्टफोनमध्ये सोय असतानाही लोक अलार्म घड्याळे आणि कॅलक्युलेटर विकत घेतात. शिवाय काही लोकांना या उपकरणांतील कलात्मकताही आकर्षित करते. त्यामुळेच या उपकरणांना आजही मागणी आहे.

सध्या इलेक्ट्रॉनिक कचरा किंवा ई-कचऱ्याबाबत मोठ्या प्रमाणात बोलले जाते. हा ई-कचरा केवळ संगणक आणि स्मार्टफोनपुरता मर्यादित नसून त्यामध्ये फ्रीज, फुड प्रोसेसर, टीव्ही, ओव्हन अशा अनेक घरगुती वस्तूंचाही समावेश होतो. तंत्रज्ञान जुने झाले किंवा अत्याधुनिक उपकरण आले जुनी उपकरणे कचऱ्यात जाणे स्वाभाविकच मानले जाते. परंतु अशा पद्धतीने जुन्या उपकरणांना मागणी येत असेल तर त्या समस्येवर मार्ग काढता येऊ शकतो. जुने ते सोने ही म्हणही जुनी आहे आणि म्हणूनच ही म्हणसुद्धा कायम राहील.

Leave a Comment