आयसीसीच्या चुकीच्या नियमांचा न्यूझीलंडला बसला फटका !


एकदिवसीय विश्वचषकावर इयॉन मॉर्गनच्या इंग्लंडने आपले नाव कोरुन नवा इतिहास घडवला आणि इंग्लंडला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वविजयाचा मान मिळाला. इंग्लंडने लॉर्ड्सच्या मैदानावर रंगलेल्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर मात केली. शेवटच्या क्षणापर्यंत हा अंतिम सामना विलक्षण उत्कंठावर्धक ठरला. शेवटच्या षटकात सामना बरोबरीत सुटल्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला. अनेक निर्णायक प्रसंग अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात आले.

सुपर ओव्हरच्या आधी अखेरच्या षटकात 3 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना स्टोक्सने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. न्यूझीलंडच्या खेळाडूने त्याला धावबाद करण्यासाठी चेंडू फेकला. स्टोक्सने त्यावेळी धावबाद होऊ नये यासाठी स्वतःला खेळपट्टीवर झोकून दिले. त्याचवेळी स्टोक्सच्या बॅटला चेंडू लागला आणि चेंडूची दिशा बदलली व चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर धावून काढलेल्या 2 धावा आणि अतिरिक्त चार धावा अशाप्रकारे 6 धावा स्टोक्सला ऐनवेळी मिळाल्या आणि याच प्रसंगानंतर सामना न्यूझीलंडच्या हातून निसटला. त्यानंतर सामना टाय झाला. विश्वचषक स्पर्धेतील सामना टाय झाल्याने अंतिम फेरीत पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळविण्यात आली.

सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने 15 धावा केल्या. न्यूझीलंडनेही प्रत्युत्तरात सुपर ओव्हरमध्ये 15 धावा केल्या आणि सुपर ओव्हर देखील टाय झाली. अशा या थरारक लढतीत अखेर इंग्लंडला आयसीसीच्या नियमांनुसार सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या मुद्द्यावर विजयी घोषित करण्यात आल्यानंतर आयसीसीच्या नियमाविरोधात नेटकऱ्यांकडून तसेच अनेक माजी क्रिकेटपटूंकडून संताप व्यक्त केला जात आहे.

अखेरपर्यंत झुंजणारा न्यूझीलंड संघच आमच्यासाठी खरा विजेता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. विश्वचषक जरी तुमच्या हातात नसला तरी आमच्यासाठी तुम्हीच खरे विजेते आहात आणि तुम्हाला आयसीसीच्या चुकीच्या नियमांचा फटका बसला आहे अशाप्रकारच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अतिरिक्त 4 धावा देण्याचा नियम अतिशय चुकीचा असून न्यूझीलंडच्या संघाला त्याचाच फटका बसला असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अनेकांनी सर्वाधिक चौकारांच्या निकषावर विजेता शोधण्याच्या नियमावरही आक्षेप घेतला आणि अजून एक सुपर ओव्हर का खेळवू नये असा सवाल उपस्थित केला आहे.

Leave a Comment