या देशात अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना केले जाणार नपुंसक


कीव्ह – आपल्या देशातील केंद्रात असलेल्या मोदी सरकारने अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर पोक्सो कायद्याला नुकतीच मंजुरी दिली. त्यामध्ये अल्पवयीन मुलांचे शोषण करणाऱ्यांना कमाल शिक्षा फाशी दिली जाणार आहे. असे असतानाच अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी युक्रेननेही नवीन कायदा केला. त्यामध्ये दोषी सापडणाऱ्यांना बळजबरी केमिकलचे इंजेक्शन देऊन त्यांना आयुष्यभरासाठी नपुंसक केले जाणार आहे. हजारो कैदी लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षा झाल्यानंतर तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. ही शिक्षा त्यापैकीच 18 ते 65 वर्षे वय असलेल्या ठराविक नराधमांना दरवर्षी दिली जाणार आहे.

यासंदर्भात तेथील स्थानिक वृत्तसंस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्धच्या नवीन कायद्याला सरकारने मंजुरी दिली. यामध्ये दोषी सापडलेल्या नराधमांना बळजबरी केमिकलचे इंजेक्शन दिले जाणार आहे. त्यांच्या शरीरातील काम भावना या केमिकलमुळे नाहीशी होईल. अल्पवयीन मुलांवर बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यांनाही ही शिक्षा लागू केली जाईल. युक्रेनच्या विविध भागांत 2017 मध्ये बलात्काराच्या 320 प्रकरणांची नोंद झाली. तर लहान मुलांवर अत्याचाराच्या घटनांची संख्या हजारोंमध्ये होती.

गेल्या आठवड्यात अवघ्या 24 तासांत अल्पवयीन मुलांवर झालेल्या अत्याचाराच्या 5 घटना समोर आल्या. सरकारी आकडेवारीमध्ये अल्पवयीन मुलांवर अत्याचाराच्या घटना हजारो असल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ब्रिटिश मीडियाशी संवाद साधताना सांगितले, की प्रत्यक्षात, लहान मुलांवर बलात्काराचे प्रमाण एवढे वाढले की आपण केवळ अंदाज लावू शकतो. प्रत्यक्षात घडलेल्या घटनांची आकडेवारी याहून कितीतरी पटीने अधिक असेल. अनेक प्रकरणांमध्ये लहान मुले किंवा मुली भीती आणि माहिती नसल्याने आपल्यावर घडलेल्या अत्याचाराची हकीगत मांडू शकत नाहीत.

नुकतेच ओडेसा प्रांतात एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरातील ओळखीच्या व्यक्तीने बलात्काराचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता तिची आरोपीने निर्घृण हत्या केली. आरोपीचे वय 22 वर्षे असून आरोपीचे नाव समोर येताच शेकडोंच्या संख्येने संतप्त नागरिकांनी त्याच्या घराला घेराव टाकला होता. त्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावून आरोपीला अटक करण्यात आली. नवीन कायद्यानुसार, दोष सिद्ध झाल्यास नपुंसक केले जाईल. सोबतच, तुरुंगवासाची शिक्षा 12 वरून 15 वर्षे करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर तुरुंगातून सुटल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीवर आयुष्यभर पोलिस नजर ठेवणार आहेत. युक्रेनमध्ये चिमुकल्यांचे लैंगिक शोषण इतके वाढले होते, की हा कायदा मंजूर करण्यासाठी युक्रेनच्या संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे लागले. सरकारसह विरोधकांनी सुद्धा या नवीन कायद्याचे स्वागत केले आहे.

Leave a Comment