राजकारणातील कटी पतंग – नवज्योतसिंह सिद्धू


पंजाब मंत्रिमंडळात मंत्री असलेले माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे रविवारी जाहीर केले. गेले काही दिवस मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्याशी सिद्धू यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य झाले होते. अमरिंदर यांनी तर एक तर मी राहिल किंवा सिद्धू राहतील, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेस नेतृत्वाला दिला होता. त्यामुळे सिद्धू यांची गच्छंती अटळ होती. अशा रीतीने भारतीय जनता पक्षातून काँग्रेसमधून येऊन आपल्याच नेतृत्वाला अडचणीत टाकणारे सिद्धू राजकारणातील कटी पतंग बनले आहेत.

जून महिन्यातच आपण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा दिला होता, असे ट्विटरवरून सिद्धू यांनी जाहीर केले. तसेच या संबंधांतील पत्रही त्यांनी सादर केले. आता कोणत्याही मंत्र्याला राजीनामा द्यायचा असेल तर एक तर तो मुख्यमंत्री किंवा राज्यपालांकडे सोपवायचा असतो. त्या ऐवजी सिद्धूंनी तो पक्षप्रमुखाकडे पाठविला होता. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चेष्टा सुरू झाली. केवळ अमरिंदर यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याची टीका झाली. त्यानंतर आपण मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर यांच्याकडेही राजीनामा देत असल्याचे त्यांना जाहीर करावे लागले.

अमरिंदरसिंह आणि सिद्धू यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वाद होते. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सिद्धूंनी पत्नी नवजोतकौर सिद्धूंना अमृतसर मतदारसंघातून मागितली. त्याला अमरिंदर यांनी कठोर विरोध केला. तेव्हा हे संबंध आणखी ताणले गेले. लोकसभा निवडणुकीत पंजाबच्या शहरी भागांत काँग्रेसची कामगिरी चांगली नाही, याला कारण सिद्धूंचा उथळपणा असल्याची टीका अमरिंदर यांनी केली. तसेच सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका घेऊन सिद्धूंनी काँग्रेसला अडचणीत आणल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर अमरिंदर यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करून सिद्धूंचे पंख कापले. सिद्धूंकडे आधी असलेली स्थानिक स्वराज्य, पर्यटन आणि संस्कृती अशी महत्त्वाची खाती काढून त्यांना ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा अशी मामुली खाती दिली. त्याच्यावर नाराज झालेल्या सिद्धूंनी तडक दिल्ली गाठली आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही दांडी मारली.

दिल्लीत त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेऊन त्यांनी आपली कैफियत मांडली. राहुल किंवा प्रियंका हे अमरिंदर यांचे कान उपटतील आणि आपले वजन वाढेल, अशी त्यांची अटकळ होती. मात्र काँग्रेसमध्ये स्वतः राहुलनीच राजीनामा देऊन पक्षाची गोची केली आणि सिद्धूंचा उरलासुरला आधार गेला.

मग सिद्धूंनी नवाच डाव खेळला. त्यांनी सचिवालयात जाणेही बंद केले आणि मंत्रिमंडळाची बैठकही टाळली. ते जणू अज्ञातवासातच गेले. पण कॅ. अमरिंदर हे राजकारणातले मुरब्बी खेळाडू आहेत. त्यानी असे कित्येक त्रागे आणि रूसवे-फुगवे पचवले आहेत. त्यांनी सिद्धूंकडे साफ दुर्लक्ष करणे चालू ठेवले. अखेर शेवटचा त्रागा म्हणून त्यांनी राहुल यांच्याकडे दिलेला राजीनामा ट्विटरवर टाकला आणि लोकांनी खिल्ली उडविल्यामुळे त्यांना तो मुख्यमंत्र्यांकडे द्यावा लागला. अमरिंदर कित्येक दिवसांपासून याची वाटच पाहत होते. त्यांनी तो राजीनामा सरळ राज्यपालांकडे पाठवला आणि पाहुण्याच्या काठीने साप मारला.

सिद्धू हे काँग्रेसमधील कानामागून येऊन तिखट झालेले नेते. भाजपमध्ये असेपर्यंत भाजपने त्यांना हातभर अंतरावर ठेवले होते. त्यामुळे तीनदा लोकसभेची निवडणूक जिंकूनही ते कधी डोईजड झाले नाहीत. मात्र 2014च्या निवडणुकीत अरुण जेटली यांच्यासाठी भाजपने त्यांना अमृतसरची जागा रिकामी करायला लावली. त्यामुळे नाराज झालेल्या सिद्धूंनी अनेक प्रकारे त्रागा केला, परंतु भाजपने त्याला दाद दिली नाही. जेटली ती निवडणूक हरले आणि भाजपनेही सिद्धूंना 2016 मध्ये राज्यसभेत पाठवले.

मात्र सिद्धूंना पंजाबच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडायचे वेध लागलेहोते. त्यामुळे तीन महिन्यांच्या आत त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भारताचे माजी हॉकी कर्णधार परगतसिंह यांच्यासह मिळून आवाज-ए-पंजाब हा पक्ष काढला. अन् एके दिवशी अचानक त्यांनी कॉंग्रेसमध्ये पाय ठेवला. काँग्रेसने त्यांना विधानसभेचे तिकिट देऊन राज्यात मंत्रीही केले. मात्र मुख्यमंत्रीपदापेक्षा कमी काहीही चालणार नाही, या महत्त्वांकाक्षेने पछाडलेल्या सिद्धूंनी नेतृत्वाशीच उभा दावा मांडला.

पंजाबमध्ये काँग्रेस ही निव्वळ अमरिंदरसिंह यांच्या करिष्म्यामुळे विजयी झाली, असे सर्वांचे मत आहे. त्यांच्याशीच भांडण मांडून ‘माझे कॅप्टन राहुल गांधी आहेत, अमरिंदर नाहीत,’ असे उद्दाम विधान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची भेट, इम्रानखान यांच्या शपथविधीला उपस्थिती, कर्तारपूर मार्गिकेवरून पाकिस्तानची भलामण अशा त्यांच्या कृत्यांमुळे लोकांच्या नजरेतूनही ते उतरले. दुसरीकडे पंजाबमधील 13 पैकी 8 जागा जिंकून अमरिंदर यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. अशा अवस्थेत सिद्धूंच्या नखऱ्यांना भीक कोण घालणार?

आज स्थिती अशी आहे, की सिद्धूंचे भाजपशी अगोदरच बिनसलेले आहे. भाजपमध्ये असतानाच त्यांनी अकाली दलाशीही दावा मांडला. आता काँग्रेसमध्येही त्यांनी अनेक शत्रू निर्माण करून ठेवले. म्हणजे पंजाबमधील तीन मुख्य पक्षांची दारे त्यांच्यासाठी बंद आहेत. या स्थितीत त्यांच्याकडे दोनच पर्याय आहेत – एक तर आम आदमी पक्षात जाणे किवा स्वतःचा पक्ष काढणे. यातील कोणता पर्याय ते निवडतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. तूर्तास तरी त्यांची अवस्था दोरी कापलेल्या पतंगासारखी झाली आहे, एवढे खरे!

Leave a Comment