खेळ जगज्जेत्याच्या दुर्दशेचे!


इंग्लंडमध्ये सध्या विम्बल्डन स्पर्धा सुरू आहे. रॉजर फेडररसारख्या दिग्गजाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला आहे. मात्र याच स्पर्धेच्या एका माजी विजेत्यावर कफल्लक होण्याची वेळ आली आहे. केवळ कफल्लकच नव्हे तर त्याच्या वस्तूंचा लिलाव झाला असून बेघर होण्याची वेळ आली आहे. याला जगज्जेत्याच्या दुर्दशेचे खेळच म्हणायला पाहिजे.

जर्मनीच्या बोरिस बेकर या खेळाडूवर ही वेळ आली आहे. एकेकाळी याच बोरिस बेकरने टेनिस कोर्टवर अधिराज्य गाजवले. बूम-बूम बेकर म्हणून जगभरात त्याची ओळख होती. भल्या भल्या प्रतिस्पर्ध्यासमोर खेळताना तो डगमगला नाही, मात्र आज तो अस्तित्वासाठी झुंजत आहे.
बोरिस बेकर या टेनिस ताऱ्याचा 1985 साली उदय झाला. वयाच्या केवळ 17व्या वर्षी त्याने अत्यंत प्रतिष्ठेच्या विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि चषकावर नावही कोरले. त्यानंतर टेनिसच्या कोर्टवर असेपर्यंत त्याने कधी मागे वळून पाहिले नाही. ऑस्ट्रेलियन ओपन 2 वेळा, विम्बल्डन 3 वेळा आणि अमेरिकन ओपन एकदा जिंकण्याचा पराक्रम बेकरने केला. जर्मनीच्याच स्टेफी ग्राफ हिच्या जोडीने त्याने टेनिसमध्ये एकानंतर एक विक्रम रचले. जर्मन क्रीडारसिकच नव्हे तर तमान जनतेच्या गळ्यातील तो ताईत झाला.

मैदानात धडाकेबाज खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या बेकरचे वैयक्तिक आयुष्य मात्र वादळी राहिले. निवृत्तीनंतर तो सातत्याने आर्थिक अडचणीत आणि वादात राहिला. एकेकाळचा जगज्जेता कर्जाच्या विळख्यात अडकला. बेकरला 2002 मध्ये 17 लाख यूरो कर दडवल्याबद्दल जर्मनीतील एका न्यायालयाने दोन वर्षांची निलंबित शिक्षा दिली होती. बेकरने 1991 पासून 1993 पर्यंत आपले निवासस्थान मोनाको या करचुकवेगिरीसाठी प्रसिद्ध देशात दाखवले होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

त्याच प्रमाणे स्पोर्टगेट या क्रीडा साहित्य कंपनीच्या दिवाळखोरीसाठीही बोरिस बेकरला जबाबदार धरण्यात आले. या कंपनीत त्याचा 60 टक्के वाटा होता. या आरोपाखाली त्याला 114,000 यूरोचा दंड भरावा लागला.

दोन वर्षांपूर्वी, 21 जून 2017 या दिवशी खुद्द बेकरला दिवाळखोर जाहीर करण्यात आलं. आर्बथ्नॉट लाथम अँड कंपनी या बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या संबंधात 2017 मध्ये एका ब्रिटीश न्यायालयाने ही घोषणा केली होती. या दिवाळखोरीपासून वाचण्यासाठी त्याने राजनयिक संरक्षण मिळाल्याचाही दावा करून पाहिला. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (सीएआर) या आफ्रिकन देशाचा क्रीडादूत म्हणून नियुक्ती झाली असल्यामुळे त्याला राजनैतिक पासपोर्ट देण्यात आला होता. त्यामुळे त्याला न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण मिळत असल्याचा दावा त्याने करून पाहिला.

मात्र “त्यांच्याजवळ असलेला राजनैतिक पासपोर्ट खोटा आहे,” असे सीएआरच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रमुख चेरुबिन मोरुबामा यांनी न्यायालयात सांगितले. या पासपोर्टचा अनुक्रमांक हा 2014 मध्ये चोरीला गेलेल्या बॅचमधील एका पासपोर्टशी जुळतो, अशी माहिती मोरुबामा यांनी दिली. तसेच या पासपोर्टवर परराष्ट्रमंत्री चार्ल्स आर्मेल दुबाने यांची स्वाक्षरी नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यातून बेकरचा खोटेपणा उघडा पडला.

अखेर गुरुवारी बेकरचे कर्ज फेडण्यासाठी त्याने जिंकलेले चषक, करंडक, ढाली आणि पदके यांचा लिलाव करण्यात आला. त्यातून त्याचं कर्ज फिटणार नाहीच पण भार मात्र थोडा भार कमी होईल. या लिलावात 32 देशांतील 495 खरेदीदारांनी भाग घेतला. त्यातून 7 लाख पाऊंड ( सुमारे 6 कोटी 03 लाख 35 हजार 662 रुपये) कमाई झाली.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या टेनिसमधील कामगिरीमुळे बेकर प्रसिद्धीस आला, त्याच टेनिसच्या हंगामाचा, खासकरून विम्बल्डन स्पर्धेचा, फायदा आम्ही या लिलावासाठी करून घेतला, असे हा लिलाव करणाऱ्यांनी सांगितले.

गेल्या वर्षीही बेकरच्या वस्तूंचा असाच लिलाव करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो अर्ध्यातच थांबवण्यात आला. लंडनमधील स्मिथ अँड विल्यमसन या कंपनीच्या वतीने हा लिलाव करण्यात आला. आम्हाला अपेक्षित होती त्यापेक्षा जास्त रक्कम या लिलावातून आली, असे या कंपनीचे मार्क फोर्ड यांनी म्हटले आहे.

“गेल्या वर्षीपेक्षा यंदा लक्षणीय प्रमाणात जास्त बोली आल्या. यातून मि. बेकर यांची लोकप्रियता अद्याप टिकून असल्याचे दिसून येते,” असे फोर्ड यांनी सांगितले.

या रविवारी फेडरर हा नोवाक जोकोविच याच्याशी अंतिम सामना खेळेल. योगायोग असा, की याच जोकोविचचे मुख्य प्रशिक्षक म्हणून 2013 ते 2016 पर्यंत बेकरने काम केले होते. शिष्य एका सन्मानाच्या उंबरठ्यावर उभा असताना गुरू मात्र नादारीत निघाला.

एका गुणी टेनिसपटूवर अशी वेळ आल्यामुळे जगभरातील क्रीडा चाहते हळहळले. पण त्याला इलाज नाही!

Leave a Comment