विम्बल्डन येथील टेनिस कोर्टचे नुकसान केल्याने सेरेना विलियम्सला दंड


सात वेळा विम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकणारी टेनिस सुपरस्टार सेरेना विलियम्स हिने आपली रॅकेट वारंवार कोर्टवर आपटल्याने विम्बलडन येथील सरावासाठी वापरण्यात येणाऱ्या टेनिस कोर्टचे नुकसान झाले असल्यानचे सांगत सेरेनाला ‘ऑल इंग्लंड क्लब’ने दहा हजार डॉलर्सचा दंड ठोठविला आहे. ‘ऑल इंग्लंड क्लब’ हे जागतिक पातळीवर खेळल्या जाणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे यजमान असतात. तीस जून रोजी टेनिसचा सराव सुरु असताना वापरण्यात येणाऱ्या टेनिस कोर्टवर सेरेना आपली टेनिस रॅकेट वारंवार जोरजोराने आपटत होती. त्यावेळी टेनिस कोर्टचे फ्लोरिंग खराब झाल्याने हा दंड ठोठविण्यात आल्याचे वृत्त सीएनएनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दंड ठोठविला गेल्याबद्दल आपण खरे तर फारसा विचार केला नसल्याचे सेरेना हिने वार्ताहरांशी बोलताना म्हटले आहे. खेळताना काही लहान चुका झाल्याने वैतागून जाऊन आपण हातातली रॅकेट जोराने खाली फेकली असल्याची कबुली देत, क्लबच्या वतीने ठोठविल्या गेलेल्या दंडाबद्दल आपल्याला कोणताही आक्षेप नसल्याचे म्हटले आहे. मात्र हातातली रॅकेट जमिनीवर फेकल्याने कोर्टचे फ्लोरिंग कसे खराब झाले हे आपल्याला नक्की समजले नसल्याचेही सेरेनाने म्हटले आहे.

गेल्या वर्षीच्या विम्बल्डन स्पर्धांच्या दरम्यानही सेरेनाला सतरा हजार डॉलर्सचा दंड ठोठविण्यात आला होता. सामना सुरु असताना आपल्या प्रशिक्षकाशी, पंचांच्या परवानगीविना संभाषण साधल्याबद्दल सामन्याच्या पंचांनी सेरेनाला टोकले असता, तिने पंचांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तिच्या या कृत्याबद्दल तिला दंड ठोठविण्यात आला होता.

Leave a Comment