‘मॅरेज सर्टिफिकेट’ साठी अर्ज केला असता, पुन्हा विवाह करण्याचा अधिकाऱ्यांचा अजब सल्ला


केरळ राज्याच्या नागरी सुविधा मंत्र्यांनी अलीकडेच नोंदणी विभागातील चार अधिकाऱ्यांना निलंबित केले जाण्याचा आदेश दिला असल्याचे समजते. त्याला कारणही तसेच घडले. विवाहाला सोळा वर्षे उलटून गेल्यानंतर पी मधुसुदनन यांनी ‘मॅरेज सर्टिफिकेट’ मिळण्यासाठी अर्ज केला असता, त्यांना पुन्हा एकदा विवाह करण्याचा अजब सल्ला या अधिकाऱ्यांनी दिला. मधुसुदनन हे कोहीकोड जिल्ह्यातील मुक्कम गावाचे रहिवासी असून, विवाहाचा ‘अटेस्टेड’ दाखला मिळविण्यासाठी त्यांनी मुक्कम येथील सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये अर्ज केला होता. मधुसूदनन यांचा विवाह सोळा वर्षापूर्वी ‘स्पेशल मॅरेजेस अॅक्ट’ अंतर्गत झाला असून, अश्या बाबतीत विवाहाचा दाखला हा, दाखल्यासाठी अर्ज केल्याच्या दिवशीच उपलब्ध करून दिला जात असतो. मात्र हा दाखला मिळविण्यासाठी मधुसुदनन यांना अनेक हेलपाटे घालावे लागल्याने मधुसुदनन यांनी अखेर अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मधुसुदनन यांची खिल्ली उडवत, ‘दाखला हवा असेल, तर पुन्हा विवाह करा’ असा अजब सल्ला दिल्याने मधुसुदनन यांना रिकाम्या हातीच परतावे लागले.

ही घटना मधुसुदनन यांनी आपल्या परिचिताच्या कानावर घातली असता, त्याने ही हकीकत सोशल मिडीयावर पोस्ट करण्याचा सल्ला मधुसुदनन यांना दिला. परिचिताचा सल्ला मानून ‘फेसबुक’ वर प्रसिद्ध केलेली मधुसुदनन यांची पोस्ट व्हायरल झाली, त्यावेळी उत्तरादाखल या अधिकाऱ्यांनी आपण केवळ थट्टा करीत असल्याचे म्हटले खरे, पण तोवर सदर घटना मंत्री महोदयांच्या कानी गेली होती. या हकीकतीची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची सूचना मंत्री महोदयांनी आपल्या सचिवांना दिली, आणि हकीकत खरी असल्याचे समजल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. अधिकाऱ्यांचे वर्तन हे अतिशय उद्दामपणाचे असून, नागरिकांना अश्या प्रकारे त्रास देण्याची प्रवृत्ती चुकीची असल्याने असे कर्मचारी सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी अयोग्य असल्याचे सांगत मंत्री महोदयांनी तातडीने या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते.

Leave a Comment