गोव्यातील भाजप – लहान तोंडी मोठा घास?


कर्नाटकातील नाटकात गुंतलेल्या काँग्रेसला बेसावध गाठून भारतीय जनता पक्षाने गोव्यात 10 आमदारांची शिकार केली खरी, परंतु आता हे यश पचवणे भाजपला जड जाईल असे दिसते. या आमदारांमध्ये काही ‘संशयास्पद चारित्र्या’च्या आमदारांचाही समावेश आहे. त्यामुळे एकीकडे भाजपच्या नेत्यांमध्ये व पाठिराख्यांमध्येही अस्वस्थता आहे, तर दुसरीकडे सहकारी पक्षांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे.

गोव्यातील कॉंग्रेसच्या 10 ‘बंडखोर’ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपच्या सहकारी पक्षांचे भवितव्य संकटात सापडले आहे. गोवा विधानसभेत एकूण सदस्य संख्या 40 असून भाजपची संख्या आता 27 झाली आहे.थेट गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावलेकर यांच्यासह 10 आमदारांनी भाजपच्या बोटीत उडी मारली. त्यामुळे पक्षाकडे दोन-तृतीयांश बहुमत आले आहे. म्हणून सहकारी पक्षांच्या पाठिंब्याची गरज भाजपला राहिलेली नाही. इतके दिवस केवळ 17 आमदार असल्यामुळे भाजपला गोवा फॉरवर्ड पार्टी या सहकारी पक्षावर आणि अपक्षांवर अवलंबून राहावे लागत असे. इतकेच नाही तर या आयात केलेल्या बंडखोरांना मंत्रिमंडळात सामील करायचे झाल्यास भाजपला या सहकारी पक्षांच्या काही मंत्र्यांना डच्चू द्यावा लागणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्यासह गोवा फॉरवर्डचे तीन आणि अपक्ष दोन मंत्र्यांना नारळ मिळणे निश्चित आहे.

त्यामुळेच अजूनही या आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे की नाही, यावरून संभ्रमाची स्थिती आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दहा जणांना सोबत घेऊन राजधानी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे या भेटीनंतर सावंत यांनी सांगितले.

एकीकडे ही स्थिती असताना भाजपच्या समर्थकांमध्ये या घटनाक्रमावरून अस्वस्थता पसरली आहे. त्यातील काही जणांनी तर आपल्या भावनांना वाटही करून दिली आहे. यातील प्रमुख स्वर हा दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल यांची होय. माझ्या वडिलांनी स्वीकारलेल्या मार्गापेक्षा वेगळ्याच मार्गावरून भाजप जात असून ही चुकीची दिशा असल्याची टीका त्यांनी केली आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर गोवा भाजपमध्ये अनेक बदल झाले आहेत. माझ्या वडिलांच्या काळात भाजपमध्ये विश्वास हा शब्द महत्त्वाचा होता. मात्र पक्ष आता नव्या दिशेने जात आहे, असे ते म्हणाले आहेत.

उत्पल पर्रिकर यांच्यासह अनेक भाजप समर्थकांचा बाबूश मोन्सेरात यांना पक्षात घेण्याला विरोध आहे. मोन्सेरात यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी अनेकदा पक्षबदल केला आहे. त्यामुळेच मोन्सेरात यांना घेतले आहे खरे परंतु पुढील निवडणुकीपर्यंत ते नेमका कोणत्या पक्षात असतील हे कोणी सांगावे, असा खोचक सवालही उत्पल यांनी केला आहे.

गोवा विधानसभेची निवडणूक 2017 साली झाली. तीत भाजपचे 13 सदस्य निवडून आले तर काँग्रेसचे 17 आमदार निवडून आले. मात्र महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 3, गोवा फॉरवर्डचे 3 व अपक्ष 3 अशा 22 जणांना सोबत घेऊन मनोहर पर्रीकर यांनी सरकार स्थापन केले होते. सरकार स्थापन झाल्यावर चौथ्याच दिवशी काँग्रेसमध्ये पहिली फूट पडली आणि विश्वजित राणे यांनी आमदारकीचा व पक्षाचा राजीनामा देत भाजपशी घरोबा केला. त्यांना मंत्री करण्यात आले आणि पोटनिवडणुकीत ते विजयीही झाले. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 14 झाले. त्यानंतर 2018 च्या अखेरीस सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे दोन काँगेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा काँग्रेसचे संख्याबळ 16 वरून 14 झाले. मात्र भाजपच्या आमदार फ्रान्सिस डिसोझा व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने भाजपचे संख्याबळ 12 पर्यंत घसरले. पर्रिकर यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या डॉ. सावंत यांनी आल्याआल्या मगोपमध्ये खिंडार पाडले. या पक्षाच्या बाबू आजगावकर आणि दीपक पाऊसकर या दोघांना त्यांनी भाजपमध्ये आणले आणि भाजपचे संख्याबळ पुन्हा 14 वर गेले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपला 3 व काँग्रेसला 1 जागा मिळाली. तेव्हा भाजपचे संख्याबळ 14 वरून 17 आणि काँग्रेसचे संख्याबळ 14 वरून 15 वर गेले. त्यात ताज्या घडामोडीमुळे काँगेसचे सदस्य पाचवर आले असून काँगेसचे विरोधी पक्षनेतेपदही जाण्याची शक्यता आहे. किमान 10 आमदार असले तरच विरोधी पक्षनेते पद मिळते.

गोव्यातील या नाट्यमय घडामोडींमध्ये काँग्रेसची फजिती झाली हे तर खरे. मात्र काँग्रेसनेही ही बाब सहजासहजी घेतलेली नाही. भाजप ‘एक देश, एक पक्षा’च्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असून आता देशाला देवच वाचवू शकेल, अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरिश चोडणकर यांनी व्यक्त केली आहे.

एकूण कायद्याची स्थिती आणि राजकीय वातावरण पाहता यात काँगेसला फारसे काही करता येईल, असे वाटत नाही. मात्र भाजप समर्थकांमध्ये असलेली अस्वस्थता आणि नाराजी हीच काँगेससाठी दिलासा ठरू शकते. यशाच्या उन्मादात भाजप काही चूक करेल का आणि आपल्या मतदारांना नाराज करेल का, याची वाट पाहण्याशिवाय काँगेस फार काही करू शकणार नाही.

Leave a Comment