मोबाईलवर फेसबुक पाहण्याच्या नादात घडले भलतेच !


रस्त्याने चालत असताना किंवा गाडी चालवत असताना मोबाईल फोनवर बोलणे, चॅट करणे, किंवा फेसबुक सारख्या अॅप्सवरील पोस्ट्स वाचण्यात गुंग होणे अनेकांना चांगलेच महागात पडू शकते. या सवयीपायी अनेक अपघात होऊन किती तरी लोकांच्या जीवावर बेतले असल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या एका तैवानी महिलेवरही असाच काहीसा प्रसंग ओढवला. सुदैवाने जवळच असलेल्या एका सजग नागरिकाने आणि मेलबर्न पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने या महिलेचे प्राण वाचविले जाऊ शकले.

घडले असे, की ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे एक महिला आपल्या हातातील मोबाईल फोनवरच्या फेसबुक पोस्ट्स वाचण्यात इतकी गढून गेली, की आपण कुठे चालत आहोत, आपल्या समोर काय वाढून ठेवले आहे, याचे भानच तिला राहिले नाही, आणि चालता चालता ही महिला अचानक, चक्क खाडीमध्ये पडली. सेंट किल्डाच्या तटावर फिरायला निघालेली ही महिला आपल्या फोनवरील पोस्ट्स पाहण्यात कमालीची गुंग असताना, चालता चालताच पोर्ट फिलिपच्या खाडीमध्ये पडली. सुदैवाने जवळपास असलेल्या एका नागरिकाने महिलेला खाडीमध्ये पडताना पाहिले आणि त्याने त्वरित पोलिसांना फोन करून घडल्या प्रकारची माहिती दिली.

महिला खाडीमध्ये पडली असल्याची सूचना मिळताच पोलिसांची बचाव तुकडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. काही मिनिटांतच वेगवान स्पीडबोटमधल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ही महिला तटापासून काही अंतरावर पोहत असलेली दिसल्यानंतर पोलिसांनी त्वरेने तिथवर पोहोचून महिलेला स्पीडबोटीत खेचून घेतले. फेसबुक पाहण्याच्या नादात आपण खाडीत पडलो असल्याचे महिलेने पोलिसांना सांगताच पोलिसांना देखील क्षणभर हसावे की रडावे हे कळेनासे झाले. सरतेशेवटी तिला उपदेशाचे डोस पाजल्यानंतर पोलिसांनी या महिलेची रवानगी जवळच असलेल्या रुग्णालयामध्ये, प्राथमिक उपचारांसाठी केली. प्रथमदर्शनी तपासणीमध्ये महिलेला कोणतीही गंभीर शारीरिक दुखापत झाली नसल्याचे निष्पन्न झाले असून, तिच्या बाबीत घडलेल्या घटनेचे उदाहरण देत रस्त्यावरून चालत असताना मोबाईल फोनचा उपयोग न करण्याचे निवेदन पोलिसांच्या वतीने नागरिकांसाठी करण्यात आले असल्याचे समजते.

Loading RSS Feed

Leave a Comment