धोनीच्या निवृत्तीवर काय म्हणतात गानकोकिळा - Majha Paper

धोनीच्या निवृत्तीवर काय म्हणतात गानकोकिळा


यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी यादरम्यान धोनीला तू निवृत्तीचा विचार करु नकोस असा आपुलकीचा सल्ला दिला आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटमध्ये नमस्कार एम एस धोनी. माझ्या कानावर तुम्हाला निवृत्ती घ्यायची आहे असे आले आहे. तरी कृपया असा विचार तुम्ही करु नका. तुमच्या खेळाची देशाला गरज आहे. तुम्ही निवृत्तीचा विचारही मनात आणू नका अशी माझी विनंती असल्याचे म्हटले आहे.


लता मंगेशकर यांनी यावेळी अजून एक ट्विट करत एक गाणे भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यासाठी शेअर केले आहे. भलेही आम्ही काल जिंकलो नसलो, तरी हरलेलो नाही असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


धोनीच्या निवृत्तीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला विचारले असता त्यानेही महेंद्रसिंह धोनीने आम्हाला त्याच्या पुढील योजनांसंदर्भात काहीच सांगितलेले नाही, असे स्पष्टीकरण देत निवृत्तीच्या अफवा फेटाळून लावल्या.

Leave a Comment