सप्टेंबरपासून भारताला मिळणार स्विस बँकेतील काळ्या पैशाची माहिती


नवी दिल्ली – स्विस बँक प्रथमच येत्या सप्टेंबरपासून भारतीयांच्या आर्थिक खात्याची सविस्तर माहिती भारत सरकारला देणार असल्यामुळे विदेशातील भारतीयांच्या काळ्या पैशाविरोधात प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारला चांगले यश मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारलायामध्ये गतवर्षी ज्यांनी बँक खाते बंद केली आहेत, त्यांची माहितीही स्विस बँक देणार आहे.

भारतीयांचे खाती क्रमांक, तेथील जमा रक्कम आणि भारतीय ग्राहकांकडून मिळणारे उत्पन्नाचे मार्ग यांची माहिती स्विस बँकेकडून सरकारला देण्यात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये त्यासाठी स्वयंचलित माहिती देवाण-घेवाण करणारी कार्यपद्धत तयार करण्यात आली आहे. स्वित्झर्लंड केंद्रीय वित्तीय विभागाच्या माहितीनुसार (एफडीएफ) भारत सरकारला दर वर्षी माहिती देण्यात येणार आहे. स्वित्झर्लंडने यापूर्वी सुमारे १०० भारतीय संस्था अथवा व्यक्तींची माहिती दिली आहे. भारतामधील कर चुकवून त्यांनी स्विस बँकेत पैसा जमा केला आहे.

भारतीयांच्या आर्थिक खात्यांबाबत स्विस बँकेकडून सप्टेंबरमध्ये माहिती मिळणार असल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी लोकसभेत दिली. स्विस बँकेत खाती असलेल्या व्यक्तींची नावे जाहीर करण्यात येणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी गोपनीयतेची तरतूद असल्याचे सांगितले. काळ्या पैशाविरोधात मोहिम सुरू झाल्यानंतर अनेक भारतीयांनी स्विस बँकेतील खाती बंद केली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment