राणी एलिझाबेथने पद त्याग केल्यानंतर अशी असणार प्रिन्स फिलीप यांची उपाधी


ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी वयाची ९२ वर्षे नुकतीच पार केली असून, त्या आजही त्यांच्या सामाजिक आणि राजनैतिक जबाबदाऱ्या आवर्जून पार पाडत आहेत. तरी आता वयापरत्वे त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या कमी करण्यास सुरुवात केली असून, या जबाबदाऱ्या त्यांनी आता त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स चार्ल्स व त्यांची पत्नी कॅमिला, चार्ल्स यांचे पुत्र प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी, त्यांच्या पत्नी केट मिडलटन आणि मेघन मार्कल, व अन्य शाही परिवारजनांमध्ये वाटून देण्यास सुरुवात केली आहे. राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप काही महिन्यांपूर्वीच औपचारिक रित्या निवृत्त झाले असल्याने बहुतेक सामाजिक किंवा राजनैतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवत असते. राणी एलिझाबेथ यांनी वयाची ९५ वर्षे पूर्ण करीत असताना, म्हणजेच २०२१ सालापर्यंत राज्यकारभाराचे संपूर्ण हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यानुसार त्यांनी आपल्या बहुतेक सर्व महत्वपूर्ण जबाबदाऱ्या ब्रिटनच्या राजगादीचे भावी वारस प्रिन्स चार्ल्स यांना सुपूर्त करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यकारभाराचे हस्तांतरण झाले, तरी राणी एलिझाबेथ आजन्म ब्रिटनच्या महाराणी राहणार असून, प्रिन्स चार्ल्स ‘किंग रिजेंट’ म्हणून राज्यकारभार स्वीकारतील, तर राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांना आतापर्यंत ‘ड्युक ऑफ एडिंबरा’ म्हणून संबोधले जात होते, त्यासोबतच राणी एलिझाबेथ निवृत्त झाल्यानंतर त्यांना ‘गार्डियन ऑफ द क्वीन’ ही उपाधी देण्यात येईल. राणी एलिझाबेथ यांनी ९५ वर्षे वयाची पायरी गाठल्यानंतर ‘रिजेन्सी अॅक्ट’ लागू केला जाऊन त्याद्वारे राणी एलिझाबेथना सर्व राज्यकारभार औपचारिक रित्या प्रिन्स चार्ल्स यांना हस्तांतरित करता येईल. मात्र ब्रिटनच्या राणी म्हणून राज्याभिषेक होण्यापूर्वी राणी एलिझाबेथ यांनी आजन्म ब्रिटीश नागरिकांच्या सेवेमध्ये राहण्याची शपथ घेतली असल्याने, त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या ब्रिटनच्या महाराणीच राहतील, तर प्रत्यक्षात राज्यकारभार हाती घेतलेले प्रिन्स चार्ल्स ‘किंग रिजेंट’ म्हणून ओळखले जातील. प्रिन्स चार्ल्स यांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर प्रिन्स विलियम यांना औपचारिक रित्या समारंभपूर्वक ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ घोषित करण्यात येईल. सध्या प्रिन्स विलियम यांना ‘ड्युक ऑफ केम्ब्रिज’ या उपाधीने संबोधले जाते. मात्र राणी एलिझाबेथने राज्यकारभाराचे औपचारिक हस्तांतरण केल्यानंतर या सर्व व्यक्तींच्या उपाधी आणि त्यायोगे घ्याव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये ही मोठे परिवर्तन घडून येणार म्हटले जात आहे.

Leave a Comment