बॉलीवूडचे हे लोकप्रिय अभिनेता, पण त्यांच्या अपत्यांची कारकीर्द मात्र फ्लॉप


बॉलीवूडची झगमगती दुनिया कोणाला हवीशी वाटत नाही? बॉलीवूडमध्ये अभिनय क्षेत्रामध्ये नाव कमाविण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी मायानगरीची वाट धरीत असतात. बॉलीवूडमध्ये एके काळी झळकलेल्या काही अभिनेत्यांना मात्र या चंदेरी दुनियेमध्ये प्रवेश करण्यासाठी फारसे झटावे लागले नाही, कारण त्यांचे पिता, बॉलीवूडमध्ये नामांकित अभिनेते म्हणून लोकप्रिय होते. मात्र या अभिनेत्यांच्या अपत्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश करूनही फारसे यश न मिळविल्याने इतक्या लोकप्रिय अभिनेत्याचे अपत्य असूनही प्रसिद्धीचे शिखर यांच्या आवाक्याबाहेरच राहिले, आणि यांची कारकिर्द सुरु झाली म्हणता म्हणता हे अभिनेते मोठ्या पडद्यावरून केव्हा दिसेनासे झाले, हे कोणाला समजले देखील नाही. बॉलीवूडमध्ये अश्या पिता-पुत्रांच्या अनेक जोड्या आहेत, ज्यामध्ये पित्याने आपल्या कारकीर्दीमध्ये अपार यश मिळविले, मात्र पुत्राची कारकीर्द फारशी उल्लेखनीय ठरली नाही. ‘लव्ह स्टोरी’ या एके काळी अफाट गाजेलेल्या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका केलेला अभिनेता कुमार गौरव, सुप्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमार यांचा मुलगा आहे. ‘लव्ह स्टोरी’ हा कुमार गौरवचा पहिला चित्रपट असून या चित्रपटामध्ये राजेंद्र कुमार आणि कुमार गौरव दोघांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट हिट झाल्याने कुमार गौरवला इतरही अनेक चित्रपट करण्याची संधी मिळाली, पण यापैकी कोणताही चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही.

एके काळी लोकप्रियतेचे शिखर गाठलेले अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन याने १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाच्या द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम नवोदित कलाकाराचा पुरस्कारही देण्यात आला. त्यानंतर फरदीनने ‘जंगल’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘हम हो गये आपके’, ‘ख़ुशी’, ‘देव’, ‘प्यारे मोहन’ इत्यादी अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या, मात्र यापाकी कोणताही चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. त्यानंतर फरदीनने बॉलीवूडपासून लांबच राहणे पसंत केले. अभिनेता हरमन बावेजाने जेव्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा तो लवकरच सुपरस्टार ठरणार असल्याचा कयास अनेकांनी व्यक्त केला होता. प्रख्यात दिग्दर्शक हॅरी बावेजा यांचा मुलगा असलेला हरमन मात्र प्रत्यक्षात बॉलीवूडमध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही, आणि केवळ पाच चित्रपट केल्यानंतरच त्याने बॉलीवूडला कायमचा रामराम ठोकला.
अभिनेते संजय खान यांचा मुलगा झायेद खान याने २००३ साली ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटाद्वारे चित्र सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘दस’, ‘वादा’, ‘शादी नंबर वन’ इत्यादी अनेक चित्रपटांत झायेदने भूमिका केल्या, मात्र यांपैकी एकही चित्रपट यशस्वी ठरला नाही. सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर याचीही बॉलीवूडमधील कारकीर्द अयशस्वीच ठरली. तुषारच्या काही चित्रपटांना माफक यश मिळाले असले, तरी यशाच्या बाबतीत तो आपल्या वडिलांशी स्पर्धा कधीच करू शकला नाही. तुषार सध्या बॉलीवूडपासून लांब असून संधी मिळाल्यास एखाद्या चित्रपटामध्ये सहायक अभिनेत्याच्या भूमिका करताना पहावयास मिळत असतो.