आयआयटी प्रवेश परीक्षेच्या प्रश्न पत्रिका पाहून ऑस्ट्रेलियन प्रोफेसर्सही स्तिमित !


यंदाच्या बारावीच्या परीक्षांच्या निकालांच्या पाठोपाठ निरनिराळ्या प्रवेश परीक्षांचे निकालही येऊ लागले आहेत. या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थी आता त्यांना हव्या त्या शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत. याच प्रवेश परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सोडवाव्या लागत असणाऱ्या प्रश्नपत्रिका, काही ऑस्ट्रेलियन प्रोफेसर्सनी पाहिल्या. या प्रश्न पत्रिका वाचून पाहिल्यानंतर या प्राध्यापक मंडळींच्या प्रतिक्रिया नेमक्या टिपणारा एक व्हिडियो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, ‘tibees’ नामक यू-ट्यूबरने हा व्हिडियो प्रसिद्ध केला आहे. या व्हिडियोमध्ये ऑस्ट्रेलियन प्राध्यापक मंडळी ‘जेईई’च्या प्रश्नपत्रिका पाहून स्तिमित झालेली पहावयास मिळत आहेत.

देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी इच्छुक विद्यार्थांना ‘जेईई’, म्हणजेच जॉइंट एन्ट्रन्स एक्झॅममध्ये उत्तम मार्कांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. तसेच या परीक्षेमध्ये सर्वोत्तम रँकिंग असलेले विद्यार्थी इंडियन इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, म्हणजेच आयआयटीमध्ये प्रवेशास पात्र ठरत असतात. या प्रवेश परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना गणित, भौतिक शास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांवर आधारित प्रश्न सोडवावे लागतात. ही परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण करणे हे विद्यार्थ्यांच्या पुढले मोठे आव्हान असते. या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी खास प्रशिक्षणही घेत असतात. पण तरीही या परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे ही कामगिरी फारशी सोपी नाही, याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियन प्राध्यापक मंडळींना येत असलेला या व्हिडियोमध्ये पहावयास मिळत आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडियोमध्ये संबंधित यू ट्यूबरने सहा ऑस्ट्रेलियन प्राध्यापकांच्या प्रतिक्रिया चित्रित केल्या असून, यांपैकी बहुतेक प्रतिक्रिया आश्चर्य व्यक्त करणाऱ्याच आहेत. डॉक्टर जेम्स हचिसन यांनी जेईईची प्रश्नपत्रिका चाळत असतानाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘अशी प्रश्नपत्रिका पाहून एखाद्याच्या तोंडचे पाणी पळाले नाही, तर ती व्यक्ती खरोखरच अतिशय बुद्धिमान विद्यार्थी असली पाहिजे’ असे म्हणत बारावीनंतर आपल्याला अशी प्रश्नपत्रिका कोणी सोडविण्यास दिली असती, तर आपल्याला रडूच कोसळले असते’, अशी कबुलीही डॉक्टर हचिसन यांनी दिली आहे. त्याच बरोबर इतक्या उच्च पातळीच्या प्रश्नपत्रिका सोडवून त्यामध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपल्याला मनापासून कौतुक वाटत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

प्रोफेसर बॅरी ह्युज गणितज्ञ असून, त्यांनी प्रश्नपत्रिकेतील गणितावर आधारित प्रश्न पाहिल्यानंतर एका तासात इतकी गणिते सोडविणे आपल्याला देखील सहजसाध्य नसल्याचे म्हटले. इतर प्राध्यापक मंडळींच्या प्रतिक्रिया देखील अश्याच होत्या. बारावीतील विद्यार्थ्यांना या प्रश्नपत्रिकांमध्ये जसे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लागणारी तयारी आणि अभ्यास, ऑस्ट्रेलियातील विद्यार्थी विद्यापीठ पातळीवर करीत असल्याचे या प्राध्यापक मंडळींचे म्हणणे आहे. त्यावरूनच जेईईच्या प्रवेश परीक्षेचे स्वरूप आपल्या लक्षात येते. अश्या प्रकारच्या परीक्षांची तयारी बहुधा पाठांतरावरच जास्त प्रमाणात अवलंबून असून, शिक्षणाच्या दृष्टीने केवळ पाठांतराचा वापर फारसा योग्य नसल्याचेही या प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment