गाडीवर धूळ आढळल्यास महानगरपालिका आकारणार एवढा दंड


आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण चालवीत असलेले वाहन स्वच्छ करण्यासाठी नेहमी वेळ मिळतोच असे नाही. धुळीने माखेलेली गाडी पाहून आसपासची मंडळी हमखास नाक मुरडत असतात. त्यामुळे सकाळी लवकर येऊन गाडी स्वच्छ करून जाणारा भैय्या एखाद्या देवदूतासम वाटला, तर त्यात नवल ते काहीच नाही. एखाद्या दिवशी धुळीने माखलेली गाडी घेऊन बाहेर पडणे भारतामध्ये चालत असले, तरी दुबईमध्ये मात्र धुळीने माखेलेली गाडी घेऊन बाहेर पडणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. दुबईमध्ये एखाद्या व्याकीच्या गाडीवर धूळ आढळल्यास त्या व्यक्तीला दंड ठोठविला जाऊ शकतो. येथील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या अनुसार धुळीने माखलेली गाडी चालविताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीला पाचशे दिरहम दंड करण्याचा नवा नियम येथील महानगरपालिकेने अंमलात आणला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे साडे नऊ हजार रुपये इतकी आहे.

गल्फ न्यूजच्या वतीने देण्यात आलेल्या वृत्ताच्या अनुसार धुळीने माखलेल्या गाड्या चालविल्याने किंवा सार्वजनिक ठिकाणी उभ्या केल्याने शहराची प्रतिष्ठा कमी होत असते. अनेकदा विमानतळावर, किंवा इतर सार्वजनिक पार्किंग्जमध्ये गाड्या उभ्या करून अनेक नागरिक काही दिवस बाहेरगावी जातात. तेव्हाही त्यांच्या गाड्या स्वच्छ करण्यासाठी जबाबदारी घेणारे इतर कोणीही नसते. अश्या वेळी धुळीने माखलेल्या या गाड्या सार्वजनिक ठिकाणी उभ्या असल्याने त्यामुळे एरव्ही सुंदर आणि स्वच्छ समजल्या जाणाऱ्या शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचे महानगरपालिकेचे म्हणणे आहे.

अनेकदा वापरात नसलेल्या, जुन्या झालेल्या, किंवा अपघात झालेल्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्याही निदर्शनाला आले असून, अश्या वाहनांच्या मालकांना या गाड्या रस्त्यावरून हटविण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात येणार असून, त्या काळामध्ये गाडी हलविली न गेल्यास महानगरपालिका हे वाहन जप्त करणार असल्याचे ही म्हटले आहे. या संबंधी कोणत्याही कारवाईसाठी वाहनाच्या मालकाने हरकत घेतल्यास त्त्याची गाडी जप्त करून लिलावामध्ये वाहनाची विक्री करण्याचा नवा नियमही लागू करण्यात येत असल्याचे समजते.

Leave a Comment