पावसाळ्यामध्ये अवश्य भेट द्या राजस्थान येतील बिशनगढला


पावसाळा सुरु झाला, आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रखर उन्हामध्ये होरपळून निघालेल्या, निस्तेज पडलेल्या निसर्गाने हिरवागार साज ल्यायला. पावसाळा म्हटला, की पावसातून चिंब भिजत, निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणारी भटकंतीही आलीच. अश्या वेळी राजस्थानमध्ये राजधानी जयपूरच्या जवळ असलेले, अरावली पर्वताच्या कुशीत वसलेले बिशनगढ, खास पावसाळ्यानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या सहलींसाठी उत्तम पर्याय आहे. सुंदर पर्वतराजी, हिरवीगार कुरणे आणि नजर ठरणार नाही इतका सुंदर किल्ला, ही बिशनगढची खासियत म्हणावी लागेल. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अरावली पर्वतराजी नयनरम्य दिसते. बिशनगढ येथे येऊन या उत्तुंग पर्वतराजीमधून पायी फिरण्याचा, ढग नसल्यास येथून सूर्यास्ताचे दृश्य पाहण्याचा, अवघड डोंगरांमधून ट्रेकिंगसाठी जाण्याचा आनंद काही औरच असतो. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसांत येथे पर्यटकांची मोठी गर्दी पहावयास मिळते.

बिशनगढ येथे असणारा राजेशाही किल्ला एका पहाडावर उभा आहे. साधारण दोनशे तीस वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या या किल्ल्याचे नूतनीकरण करवून त्याचे रूपांतर आता ‘आलिला फोर्ट बिशनगढ’ नामक हेरीटेज हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. खास राजस्थानी ढंगाची वास्तुशैली असलेल्या या किल्ल्यामध्ये ५९ आलिशान कक्ष आहेत. सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज आणि राजेशाही थाट असलेले असे हे हॉटेल आहे. बिशनगढला भ्रमंतीसाठी येणारे पर्यटक येथील स्थानिक, पारंपारिक खाद्यपदार्थही आवर्जून चाखून पहात असतात. राजस्थान राज्य पर्यटकांमध्ये तसेही अतिशय लोकप्रिय असून, येथील पारंपारिक भोजनही लोकप्रिय आहे. बिशनगढ देखील याला अपवाद नसून, पारंपारिक पद्धतीने चुलीवर शिजविलेल्या भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक आवर्जून गर्दी करीत असतात.

बिशनगढपासून सुमारे एका तासाच्या अंतरावर आमेरचा भव्य किल्ला आहे. या ठिकाणी पर्यटकांना हत्तीवरल्या सफरीचा आंनद घेता येऊ शकतो. तसेच किल्ल्यामध्ये असलेली अनेक राजेशाही दालने, संग्रहालये, प्रदर्शनेही पर्यटकांना पाहता येऊ शकतात. या किल्ल्याचे ‘मयूरद्वार’, किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-खास’मध्ये ठेवलेली, आणि एके काळी शाही मेजवान्यांच्या प्रसंगी वापरली जाणारी भली मोठी चांदीची भांडी, किल्ल्यातील वस्तूसंग्रहालयामध्ये, जयपूरचा आणि शाही खानदानाचा इतिहास वर्णन करणाऱ्या वस्तूंचे संग्रह या किल्ल्याची खासियत आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment