कोण होणार पुढचा सद्दाम हुसेन?


सद्दाम हुसेन. इराकचा माजी अध्यक्ष आणि हुकूमशहा. ज्या कोणाला राजकारणात आणि ताज्या घडामोडींत रस आहे अशा व्यक्तीला हे नाव माहीत नसणे शक्यच नाही. सद्दामला फाशी देऊनही आता एक तपापेक्षा जास्त काळ उलटला. तरीही सद्दामचे नाव अधूनमधून कानावर येतेच.

सद्दामने 1970च्या दशकाच्याशेवटी इराकची सूत्रे हाती घेतली. इराकमधील तेल उदयोगांचे राष्ट्रीयकरण करण्यात हुसेनचा महत्त्वाचा वाटा होता. त्याने 1980 मध्ये इराणवर आक्रमण केले. तब्बल 8 वर्षे चाललेले हे युद्ध 1988 मध्ये शस्त्रसंधी होऊन थांबले. इराकला या युद्धात सौदी अरेबिया आणि अन्य काही अरब राष्ट्रांनी आर्थिक साहाय्य केले होते तर अमेरिका व पाश्चात्त्य देश दोन्ही बाजूंना गुप्तपणे शस्त्रे पुरवीत होते, ही त्यातील गंमत.

इराण-इराक युद्धात दोन्ही देशांची मोठी हानी झाली. हजारो सैनिक जखमी वा मृत झाले. अनेक कुटुंबे निराधार झाली. तरीही 2 ऑगस्ट 1990 रोजी त्याने कुवैतवर आक्रमण केले आणि कुवेत इराकला जोडला. जगभर इराकविरूद्ध जनमत तयार झाले. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्रांच्या फौजांनी फेबुवारी 1991 मध्ये इराकी सैन्याला कुवेतमधून बाहेर काढले. इराकी सैन्याने माघार घेताना कुवेतमधील तेलाच्या विहिरी पेटवून देऊन कुवेतचे अतोनात नुकसान केले.

ज्यांनी ज्यांनी सद्दामला आणि त्याच्या सत्तेला विरोध केला अथवा ज्यांच्या विरोधाची त्यांना भीती वाटली, अशा सगळ्यांना सद्दामने कैद केले वा ठार मारले. अखेर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त फौजांनी मार्च 2003 मध्ये इराकवर हल्ला चढविला. हुसेनला पकडण्यासाठी आणि देशात दडवून ठेवलेली अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी हा हल्ला होता. एप्रिल महिन्यात बगदाद संयुक्त राष्ट्रांच्या सेनेच्या ताब्यात आले आणि सद्दाम अज्ञातवासात गेला. मात्र तिकित जवळच्या अद्वार या गावी त्याला डिसेंबर 2003 मध्ये पकडण्यात आले आणि कुर्द, शिया मुस्लिम इत्यादींच्या निर्घृण हत्याकांडाचे आरोप ठेवून त्याला 2006 मध्ये फाशी देण्यात आले.

या सगळ्यामध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची होती. कारण जोपर्यंत त्याने इराणला विरोध चालू ठेवला होता तोपर्यंत अमेरिकेने त्याला पूर्ण सहाय्य केले होते. आता पश्चिम आशियात जवळपास तशीच स्थिती निर्माण झाली असून अमेरिका सौदी अरेबियाला मदत करत आहे. म्हणूनच पश्चिमी आशियात पुन्हा एक नवा सद्दाम निर्माण होणार का, अशी शंका अनेकांना भेडसावत आहे. वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राचे एक संपादक आणि स्तंभलेखक जॅक्सन डाईहल यांनी नुकताच हा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘अवर न्यू सद्दाम हुसेन’ (आमचे नवे सद्दाम हुसेन) या शीर्षकाचा लेख त्यांनी लिहिला आहे.

अमेरिका आणि तिच्या पाश्चिमात्य सहकाऱ्यांनी सद्दामवर आपली बाजी लावली. त्याची परिणती 1990 मध्ये कुवैतवर त्याने हल्ला करण्यात झाली आणि तेथून पश्चिम आशियात अंतहीन युद्धांची एक मालिका सुरू झाली. आता 30 वर्षांनंतर अमेरिकेचे नेते व अधिकारी तीच चूक पुन्हा करत आहेत. सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या पत्रकार जमाल खशोगजी याची क्रूर हत्या करणे, महिला अधिकारांची मागणी करणाऱ्या महिलांना यातना देणे आणि त्यांना तुरुंगात टाकणे, येमेनमध्ये युद्ध गुन्हे करणे आणि लाखों लोकांचा जनसंहार करणे यांसारख्या गुन्ह्यांचा आपल्याला तिटकारा आहे, असा दावा हे देश करतात. मात्र गेल्या आठवड्यात जपानमधील ओसाका येथे जी-20 संमेलनात हेच नेते सलमान यांच्या भोवती गोंडा घोळत होते, अशी जहरी टीका डाईहल यांनी केली आहे.

या नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपासून युरोपच्या अनेक लोकशाही देशांचे पंतप्रधान व अध्यक्ष सामील होते. युवराज सलमान सौदी अरेबियाच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न करत आहेत, ते इस्लामी कट्टरवादाशी लढत आहेत, ते आपले व इस्राएलचे सहकारी आहेत असे युक्तिवाद हे नेते करतात. मात्र सद्दाम यांच्या प्रमाणेच मोहम्मद बिन सलमान यांचेही अनेक अपराध आहेत. त्यांच्या आदेशावरून तुरुंगात डांबलेल्या महिला अद्याप कोठडीत बंद आहेत. त्यांची लढाऊ विमाने आताही येमेनवर बॉम्बवर्षाव करत आहेत आणि ते अण्वस्त्रे बनवण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. पाश्चिमात्य देशांनी त्यांना हे करण्यापासून रोखले नाही तर पुढचे सद्दाम हुसेन तेच ठरतील, असा इशारा डाईहल यांनी दिला आहे.

Leave a Comment