बांगलादेश क्रिकेटने केली कोचची हकालपट्टी !


लंडन – मुख्य प्रशिक्षक स्टीव्ह ऱ्होड्स यांची आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडलेल्या बांगलादेश संघाने एकमताने हकालपट्टी केली आहे. ऱ्होड्स यांना कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आतच मायदेशी परतावे लागणार आहे.

२०१८ च्या जूनमध्ये स्टीव्ह ऱ्होड्स यांची बांगलादेशच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली होती. ऱ्होड्स ही जबाबदारी पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत सांभाळणार होते. पण हा करार संपवण्याचा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि ऱ्होड्स यांनी एकमताने घेतला आहे.

विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडताच बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक कोर्टनी वॉल्श आणि फिरकीचे प्रशिक्षक सुनील जोशी यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. तर, सध्या संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक नील मॅकेंझी सुट्टीवर गेले आहेत. बांगलादेशची कामगिरी यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत चांगली झाली होती. जायंट किलर म्हणून ओळख असलेल्या या संघाने सर्वांना प्रभावित केले होते. पण उपांत्य फेरी गाठण्यात त्यांना अपयश आले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गुणतालिकेत बांगलादेश आठव्या स्थानावर आहे. ९ सामन्यामध्ये त्यांनी ३ विजय मिळवले आहेत.

Leave a Comment