भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी 50 दिवस, 17 देश, पार केले 25 हजार किमी अंतर


आता अवघ्या काही दिवसातच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. आज भारत आणि न्युझीलंडमध्ये काल पावसामुळे रद्द झालेला उपांत्य फेरीचा सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाकडून चाहत्यांच्या फार जास्त अपेक्षा आहेत. जगभरातील क्रिकेट चाहते भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत, यामध्ये सिंगापूरचे माथुर कुटुंब प्रकाशझोतात आले आहे. क्रिकेट आणि ड्रायव्हिगचे या कुटुंबाचे असे प्रेम आहे की, टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी हे कुटुंब 50 दिवसांत 17 देशांची सफर करून इंग्लंडमध्ये दाखल झाले आहे.

या प्रवास दरम्यान कुटुंबातील सहा सदस्यांनी 25,000 किलोमीटर अंतर पार केले आहे. 17 मे रोजी आपल्या या प्रवासाला कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी सुरुवात केली. ब्रिटनच्या लीड्स शहर येथे हे कुटुंब 5 जुलै रोजी पोहोचले, जेणेकरून 6 जुलैचा भारत-श्रीलंकेचा सामना पाहायला मिळेल. आता त्यांना उपांत्य फेरी आणि 14 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याची प्रतिक्षा आहे. ही यात्रा अदिती आणि अनुपम माथुर या दांपत्याच्या इच्छाशक्तीमुळे पार पडली आहे.

अनुपम यांनी एके दिवशी जेवण करत असताना कुटुंबासमोर ही कल्पना मांडली. विशेष म्हणजे या कल्पनेला कुटुंबाने त्वरित उचलून धरले. सिंगापुरपासून लंडन दरम्यान घडलेल्या या प्रवासा दरम्यान कुटुंबातील 3 वर्षेपासून 67 वर्षांपर्यंतच्या तीन पिढ्या सामील होत्या. कुटुंबाच्या या धाडसाचे सध्या बरेच कौतुक होत आहे.

Leave a Comment