संजय दत्तची निर्मिती असलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर रिलीज


मराठी सिनेसृष्टीत निर्मितीक्षेत्रात बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात अभिनेता संजय दत्त पाऊल ठेवत असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला त्याच्या निर्मिती संस्थे अंतर्गत तयार होत असलेला ‘बाबा’ चित्रपट येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.


‘बाबा’ हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या बापाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. कामाच्या जाळ्यात अडकलेल्या वडिलांचे प्रेम ओठांवर नसले तरी, त्याच्या मनात कायम कुटुंबाची चिंता असते अशाच आशयाचा असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर ‘भावनेला भाषा नसते’ अशी दमदार टॅगलाईन देण्यात आली आहे.

एका वडील आणि मुलाच्या नात्याची असलेली सुंदर कथा ‘बाबा’ चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहायला मिळते. हा चित्रपट संजय दत्तने त्याच्या वडिलांना समर्पित केल्यामुळे या चित्रपटात वडील आणि मुलाचे भावनिक नाते पाहायला मिळणार आहे. २ ऑगस्ट २०१९ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

चित्रपटात ‘तनु वेडस मनू’ फेम अभिनेता दीपक डोब्रीयाल मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तो ओमकारा, तनू वेड्स मनू, दबंग 2, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, हिंदी मीडियम यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकला आहे. तनू वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटातील त्याचे संवाद चांगलेच गाजले होते. त्यांच्याबरोबर नंदिता पाटकर स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे.

Leave a Comment